
लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना संभावना सेठच्या आयुष्यात अखेर आनंदाचे क्षण आले आहेत. लग्नाच्या तब्बल दहा वर्षांनंतर संभावना आणि तिचा पती अविनाश द्विवेदी आई-वडील झाले असून त्यांनी जुळ्या बाळांचे स्वागत केले आहे. वयाच्या 45 व्या वर्षी संभावना सेठला मातृत्वाचा आनंद मिळाला आहे. सरोगसीच्या माध्यमातून त्यांच्या घरी एका मुलाचा आणि एका मुलीचा जन्म झाला. ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर आणि त्यांच्या यूट्यूब चॅनेलद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली. बाळांच्या जन्मावेळी चित्रीत करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये संभावना अतिशय भावूक झालेली दिसते. आपल्या मुलांचा जन्म प्रत्यक्ष पाहताना तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. या भावनिक क्षणी पती अविनाश द्विवेदी यांनी तिला आधार दिला.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये संभावना आणि अविनाश आपल्या नवजात बाळांना कवेत घेताना दिसत आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पालक झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत आहे. आनंद व्यक्त करत संभावना सेठने इंस्टाग्रामवर लिहिले, “यंदा आमच्या घरी दिवाळी आधीच आली आहे. लक्ष्मी आणि गणेश दोघेही आमच्या आयुष्यात आले आहेत. आमची मने कृतज्ञतेने भरून आली आहेत. हर हर महादेव!”
मातृत्वाचा हा प्रवास संभावनासाठी सोपा नव्हता. यापूर्वी तिने अनेकदा आई होण्यासाठी प्रयत्न केले होते. तिने स्वतः सांगितले होते की, तिला किमान आठ वेळा आयव्हीएफ उपचार घ्यावे लागले, मात्र त्यातून यश मिळाले नव्हते. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अखेर तिचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या आनंदाच्या बातमीनंतर चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी संभावना आणि अविनाश यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.





























































