
>> दिलीप ठाकूर
काही चित्रपट निर्माते हे केवळ चित्रपटाची संख्या वाढवत निर्मितीतच अडकून पडले नाहीत, तर त्यांनी त्याबरोबरच चित्रपट क्षेत्रातील अन्य काही पदे भूषवली, चित्रपटसृष्टीविषयक जबाबदारीने काम केले. असेच एक चित्रपट निर्माते पहलाज निहलानी. एक बहुस्तरीय आणि बहुढंगी वाटचाल. पहलाज निहलानी यांनी ‘इल्जाम’ या आपल्या चित्रपटातून गोविंदा याला रुपेरी पदार्पणाची संधी दिली. त्याशिवाय त्यांनी ‘हथकडी’ (त्यांनी निर्मिलेला पहिला चित्रपट), ‘आग ही आग’, ‘पाप की दुनिया’, ‘दिल तेरा दीवाना’, ‘मिट्टी और सोना’, ‘अंदाज’, ‘भाई भाई’, ‘आग का गोला’, ‘आंधी तुफान’, ‘फस्ट लव्ह लेटर’ अशा अनेक चित्रपटांची ऐंशी आणि नव्वदच्या दशकात निर्मिती केली. मसालेदार, मनोरंजक चित्रपट हे त्यांचे वैशिष्टय़.
चंकी पांडे, दिग्दर्शक डेव्हिड धवन यांची कारकीर्द घडवण्यात पहलाज निहलानी यांचा खूप मोठा सहभाग आहे. विशेष म्हणजे गोविंदाने राजकारणातून पुन्हा चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले तेव्हा पहलाज निहलानी यांनीच त्याच्यासाठी ‘रंगीला राजा’ (2017) या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. मुमताजने अनेक वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले तेव्हा पहलाज निहलानी यांनीच मुमताजला ‘आंधिया’ (1990) या चित्रपटात संधी दिली आणि जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्या चित्रपटाचा भव्य मुहूर्त केला.
नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला सुनील शेट्टीने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकताना पहलाज निहलानी यांनीच त्याला सहकार्य केले आणि अंधेरीतील सेठ स्टुडिओत त्यांनी सुनील शेट्टीला मारधाड ऍक्शन हीरोची भूमिका देत ‘एक और फौलाद’ (1991) या चित्रपटाचा भव्य दिव्य दिमाखदार मुहूर्त घडवला. प्रत्यक्षात हा चित्रपट मुहूर्तापलीकडे गेला नाही, पण सुनील शेट्टी चित्रपटसृष्टीत कार्यरत झाला. अमिताभ बच्चन यांचे रंगभूषाकार दीपक सावंत यांनी ‘आक्का’ या चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा पहलाज निहलानी यांनी त्यांना मोठय़ा प्रमाणावर सहकार्य केले.
ते चित्रपट वितरक म्हणूनही कार्यरत होते आणि सनी देओलला व्यावसायिक यशाची गरज असलेल्या राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘घायल’ या चित्रपटाचे त्यांनी मुंबई विभागात वितरण केले. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या नवीन चित्रपटाच्या व्यावसायिक यशापयशाचे ते अचूक ठोकताळे बांधत आणि पहिल्या दिवशीच्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून ते अमुक चित्रपट यशस्वी ठरेल अथवा नाही हे सांगत. ते त्यांचे बराच काळ खास वैशिष्टय़ ठरले होते. त्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीचा विस्तार करताना ग्रॅण्ट रोड (पूर्व) येथील निशात या इंग्रजकालीन एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटरचे पुनरुज्जीवन केले. ते अधिक देखणे केले आणि त्यांनी या दशकात अनेक हिंदी चित्रपट मल्टिप्लेक्सबरोबरच प्रदर्शित करून नवीन पायंडा पाडला हे विशेष उल्लेखनीय.
त्यांच्या दीर्घकालीन अनुभवाला एक वैशिष्टय़पूर्ण संधी मिळाली ती चित्रपट परीक्षण मंडळाचे (सेन्सॉर बोर्ड) ते 2015 साली अध्यक्ष झाले त्या वेळी. त्यांनी ‘उडता पंजाब’, ‘इंदू सरकार’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘बाबू मोशाय बंदूकवाला’ या वादग्रस्त ठरलेल्या अनेक चित्रपटांमध्ये आवश्यक तेथे बदल सुचवले आणि वाद निर्माण झाले. अनेक घडामोडींनंतर त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला, पण हे सहज शक्य झाले नाही. यावरून बरेच वाद निर्माण झाले होते. जेम्स बाँडच्या ‘स्पेक्टर’ या विदेशी चित्रपटांतील चुंबन दृश्याची लांबी कमी केल्यावरून सोशल मीडियात त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणावर टीका करण्यात आली. अनेक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकही पहलाज निहलानी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते आणि त्यांनी तसे बोलूनही दाखवले. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारनेच 2017 साली या पदावरून दूर केले. नव्वदच्या दशकात अनिल कपूरने पहलाज निहलानी निर्मित ‘अंदाज’ या चित्रपटात ‘खडा है’ या द्वय़र्थी गाण्यात अभिनय केला होता आणि त्यावर अनिल कपूरने अलीकडेच भाष्य करताना नाराजी व्यक्त केली असता पहलाज निहलानी यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. पहलाज निहलानी यांचा चित्रपटसृष्टीतील चौफेर वावर कायमच उत्साही आणि स्पष्टवत्तेपणाचा होता.































































