तलवारीचा खणखणाट, ढोल-ताशांचा गजर आणि शिवरायांचा जयजयकार; भगव्या उत्साहात रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सुवर्ण सिंहासन सजले, रायगडाचे भाग्य उजळले…चौघडे आणि ढोल वाजले, शिवबा आपले राजे झाले…’ या गाण्यांचे सूर आज किल्ले रायगडावर गुंजले आणि हजारो शिवभक्तांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. निमित्त होते आजपासूनच भगव्या उत्साहात सुरू झालेल्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे. तलवारींचा खणखणाट, ढोल-ताशांचा गजर आणि शिवरायांचा गगनभेदी जयजयकार यामुळे रायगडावर जणू शिवकाळ अवतरला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून मावळे हिंदवी स्वराज्याच्या राजधानीत आले असून अवघा किल्ला भगव्या झेंड्यात न्हाऊन निघाला आहे. येथील मातीच्या कणाकणातून ऐकू येतोय तो फक्त शिवरायांचाच जयजयकार.

शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर ‘जागर शौर्य भक्तीचा’ या संकल्पनेवर आधारित दुपारपासूनच विविध कार्यक्रमांचा शुभारंभ झाला. नगारखाना येथे गडाची विधीवत पूजा करण्यात आली. शिवराज्याभिषेक महोत्सव समिती व रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने गडपूजन झाले. त्यानंतर ‘धार तलवारीची.. युद्धकला महाराष्ट्राची’ या उपक्रमांतर्गत मावळ्यांची तलवारबाजी, दांडपट्टा वाखाणण्यासारखी होती. त्यामुळे शिवभक्तांमध्ये उत्साह संचारला.

गोंधळ, पोवाडा, जागर

सूर्य मावळतीला आला तेव्हा होळीच्या माळावर ढोल-ताशा तसेच लेझीमचा आवाज घुमू लागला. तसेच वारकऱयांच्या टाळ-मृदंगांचा गजरही झाला. मोठय़ा उत्साहात लहानांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण या  ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले होते. राज सदरेवर रात्री ‘जागर शिवशाहिरांचा.. स्वराज्याच्या इतिहासाचा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यातून शिवचरित्र व स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाला पुन्हा उजाळा मिळाला. शिरकाई देवीच्या मंदिरात उदे गं अंबे उदे… अशा जयघोषात गोंधळ घालण्यात आला तेव्हा तर शौर्य आणि भक्तीचा जागर टीपेला पोहचला होता. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने रायगड किल्ल्याला अनोखी शिवझळाळी प्राप्त झाली आहे. उद्या शनिवारी शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा होणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.