
अनिवार्य खुल्या जागेचा बेकायदेशीर-धोकादायक वापर, अग्निशमन यंत्रणेकडे दुर्लक्ष आणि बेकायदा बांधकाम अशा कारणांमुळे पालिकेने अंधेरीतील चार हॉटेल, बारवर जप्ती आणि तोडकामाची कारवाई केली आहे. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार प्रशासकीय विभाग, आरोग्य विभाग, अनुज्ञापन आणि इमारत-कारखाना विभाग आणि अग्निशमन दलाकडून ही कारवाई करण्यात आली. अंधेरी पश्चिमेतील वॉकमन बार, बोरा बोरा, चायना गेट, कारवन सेराई आणि होमटाऊन या हॉटेल व बारवर ही कारवाई करण्यात आली. दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 23 जणांचा बळी गेल्यानंतर पालिकेने सुरक्षेच्या कारणास्तव मोहीम हाती घेतली आहे. 6 ते 20 जून या कालावधीत हॉटेल्सची विशेष तपासणी केली जाणारअसल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली.




























































