
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिवसेनेने वृक्षरोपण मोहीम हाती घेतली आहे. आज शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत दिंडोशी येथे शाखा क्र. ४०/४१ च्या वतीने शीला रहेजा उद्यान परिसरात वृक्षारोपण करून या मोहिमेला सुरूवात करण्यात आली. पुढील आठ दिवस ही मोहीम अशीच सुरू राहणार असून वृक्ष संगोपन व संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

शिवसेनेकडून सुरू केलेल्या आठ दिवसीय वृक्षारोपण मोहिमेदरम्यान शेकडो झाडे लावण्यात येणार आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, दिंडोशी विधानसभेमध्ये बुवा साळवी मैदान, शारदा गोविंद पवार उद्यान, प्रियदर्शनी उद्यान, शांताराम तलाव, स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती सुनील प्रभू यांनी दिली. केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, त्यासाठी पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने एक झाड दत्तक घेत त्याचे संगोपन करण्याचे आवाहन ही प्रभू यांनी केले. यावेळी नगरसेवक सुहास वाडकर, शाखाप्रमुख संपत मोरे, संदीप जाधव, उपशाखाप्रमुख अरुण साटम, विकास पालाडे, बाबू गावडे, शाखा समन्वयक ऋतुजा गुजर, महिला शाखा संघटक पद्मा राऊळ, महापालिकेचे सहाय्यक उद्यान अधीक्षक पूर्व अमोल इथापे, उद्यान विद्या सहाय्यक चैत्र मावची आदी उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रभाग क्र. १९२ मध्ये शिवसेना विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव-नगरसेवक साईनाथ दुर्गे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी शाखाप्रमुख प्रवीण नरे, शाखा संघटक रीमा पारकर, शाखा समन्वयक रवीकांत पडयाची, कल्पना पालेकर, चंद्रकांत झगडे तसेच शाखेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ताडदेवमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. शिवसेनाप्रमुखांची स्मृती जागविण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ५०० तुळशीच्या रोपट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी अरुंधती दुधवडकर, हेमंत दुधवडकर, सुप्रिया शेंडेकर, स्वाती वळंजू, यशोदा कोटीयन, काळूराम रोकडे, शंकर धुमाळ, रमेश भोसले, अशोक महाजन, रघुनाथ सरवणकर, विनायक घाडी, विजय कदम, आदी उपस्थित होते.































































