
>> रितेश पोपळघट, [email protected]
कोणत्याही प्रगतशील देशाचा कृषी क्षेत्रातील प्रगतीचा आलेख पाहता त्याचा पाया कृषी विषयाचे शिक्षण आणि प्रशिक्षण हाच दिसून येतो. परंतु भारतात मात्र अगदी उलट चित्र आहे. शेतकऱ्यांचा दृष्टिकोन आणि कार्यपद्धती बदलू शकेल अशा प्रभावी प्रशिक्षणाचा अभाव तरुणांना या क्षेत्रापासून दूर ठेवतो.
मागील आठवडय़ात नाशिकमधील कृषी प्रशिक्षण क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम करणाऱ्या एका समूहाच्या सोशल मीडियावरील पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये एका शेतकरी मित्राची प्रतिक्रिया वाचली. त्याने लिहिले होते, ‘आता शेतकऱ्याकडून पैसे घेऊन त्याचा सातबारा घेता का?’
ही प्रतिक्रिया वाचल्यानंतर माझे मन थोडे हेलावून गेले. पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये शेती जमिनीचे दर सध्या साधारणपणे प्रति एकर 40 ते 70 लाख रुपयांच्या घरात आहेत. अशा परिस्थितीत ज्या जमिनीवर तो शेतकरी शेती करणार आहे, त्या जमिनीच्या किमतीच्या तुलनेत प्रशिक्षणाची फी केवळ 1/400 ते 1/700 एवढी नगण्य होती. तरीसुद्धा तो शेतकरी ‘सातबारा घेता का?’ अशी भाषा वापरत होता. मूलत आम्हाला शेतीतील सर्व कळते, आम्हाला कुणी काय सांगावे अशादेखील अविर्भावात अनेक शेतकरी असतात हेदेखील आम्ही अनुभवले आहे. यावरून शेतकरी वर्गामध्ये ‘शिक्षणा’विषयी किती अनास्था आहे याची कल्पना येते.
शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी शेती व्यवसायाचे अर्थशास्त्र मांडताना म्हटले होते की, ‘जगातील सर्वात जुना व्यवसाय म्हणजे शेती. तसेच पृथ्वीतलावरील उपभोग्य वस्तूंचा गुणाकार करणारा आणि एका दाण्याचे हजार दाणे बनवणारा हा एकमेव व्यवसाय आहे.’ आजही हे विधान तितकेच सत्य आहे. मात्र याची जाणीव शेतकरी वर्गाला कितपत आहे, हा अभ्यासाचा विषय आहे.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी एका संशोधन प्रकल्पाच्या निमित्ताने माझे काही सहकारी राज्यातील विविध द्राक्ष पट्टय़ांमध्ये फिरले होते. त्यानंतर सादर झालेल्या अहवालामध्ये एक महत्त्वाची बाब समोर आली. उत्पादन कसे घ्यायचे याचे ज्ञान शेतकऱ्यांकडे होते, परंतु त्या उत्पादनातून अधिक मूल्य कसे मिळवायचे, बाजारपेठेत योग्य दर कसा मिळवायचा, विक्रीचे नियोजन कसे करायचे यासंबंधीचे ज्ञान बहुतांश शेतकऱ्यांकडे नव्हते. म्हणजे एखाद्या बाळाला जन्म द्यायचा, त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचे, त्याच्या संगोपनासाठी सर्वस्व पणाला लावायचे आणि शेवटी त्याच्या भवितव्याची वेळ आली की त्याला दुसऱ्याच्या हवाली करून स्वत मात्र जे काही मिळेल त्याची वाट पाहायची. चांगला मोबदला मिळाला तर ठीक, अन्यथा जे मिळेल त्यात समाधान मानायचे. दुर्दैवाने आज अनेक शेतकऱ्यांची अवस्था याहून वेगळी नाही.
कृषी क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक मंगेश भास्कर यांचे एक वाक्य मला कायम भावून जाते. ते म्हणतात, “मेंदूला जे माहीत असते, तेच डोळे शोधतात.’’ या वाक्यामध्ये अत्यंत गहन अर्थ दडलेला आहे. मुळात शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाची विक्री कशी होते, ते अंतिम ग्राहकापर्यंत कोणत्या मार्गाने पोहोचते आणि त्या प्रवासात ‘मूल्यसाखळी’ कशी कार्य करते, हेच समजले नाही तर मूल्यसाखळीत होणारी गळती, मध्यस्थांचे नफे किंवा स्वतच्या वाटय़ाला येणारे कमी मूल्य त्याला समजणार तरी कसे? हाच या विचाराचा मर्म आहे. यालाच जोडून इंग्रजी वर्तमानपत्रातील अनुभवी कृषी पत्रकार पार्थ सारथी बिस्वास यांचे एक वाक्यही डोळे उघडणारे आहे. ते म्हणतात, “शेती क्षेत्रात शेतकरी सोडून सर्वांनी पैसे कमावले आहेत.’’ हे वाक्य इतके चपखल आहे की, ते कृषी क्षेत्रातील कटू वास्तव अधोरेखित करते. शेतीमधील निविष्ठा विक्रेते, अवजारे व यंत्रसामग्री पुरवठादार, विद्यापीठे, शास्त्रज्ञ, व्यापारी, वाहतूकदार, राजकारणी अगदी बाजार समित्यांमधील हमालसुद्धा अनेकदा शेतकऱ्यांपेक्षा अधिक आर्थिकदृष्टय़ा सक्षम झालेले दिसतात. मात्र संपूर्ण मूल्यसाखळीचा पाया असलेला शेतकरीच सर्वात कमी आर्थिक लाभ मिळवतो.
आजही आपण शेतकऱ्याला ‘अन्नदाता’ किंवा ‘पोशिंदा’ म्हणून गौरवतो, परंतु वास्तव असे आहे की, अनेकदा त्याला स्वतच्या श्रमाने पिकवलेल्या अन्नाची किंमतही योग्यरीत्या मिळत नाही. हीच भारतीय शेतीसमोरील सर्वात मोठी शोकांतिका आहे. विशेष म्हणजे, ज्याला आयुष्यात काहीच जमले नाही तो शेवटी घरातील ‘शेतकरी’ बनतो, हीदेखील आपल्या समाजातील एक कटू वास्तवता आहे. त्यामुळे शेतकरी म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या वैचारिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासावर काम करणे किती आवश्यक आहे, याचे महत्त्व अधोरेखित होते. भारतातील कृषी शिक्षणाची एकूण रचना अत्यंत कमकुवत आहे. शालेय स्तरावर कृषी विषयाला जवळपास स्थानच नाही, तर महाविद्यालयीन स्तरावरही या विषयाकडे मोठय़ा प्रमाणात अनास्था दिसून येते. कृषी विभाग अनेकदा केवळ औपचारिकता म्हणून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात, तर कृषी विद्यापीठांकडे शेतकऱ्यांचा दृष्टिकोन आणि कार्यपद्धती बदलू शकेल अशी प्रभावी प्रशिक्षण पद्धती उपलब्ध नाही.
आजच्या काळातील सर्वात मोठा माहितीचा स्रोत म्हणजे सोशल मीडिया. मात्र त्यावरील परिस्थितीही फारशी समाधानकारक नाही. कोणतीही व्यक्ती स्वतला तज्ञ म्हणून सादर करताना दिसते आणि माहितीच्या गुणवत्तेवर कोणतेही नियंत्रण नसते. महात्मा फुले यांनी मांडलेले तत्त्वज्ञान आजही तितकेच समर्पक वाटते – ‘विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।’
या विचारांचा खरा अर्थ जर शेतकरी वर्गाला उमगला असता, तर आजची परिस्थिती निश्चितच वेगळी असती. मुळात ‘शिक्षण’ आणि ‘प्रशिक्षण’ यांवरील गुंतवणूक शेतकऱ्यांना अनेक पटींनी आर्थिक परतावा देऊ शकते, याची पुष्टी करणारे अनेक संशोधन अहवाल आणि अनुभव आज उपलब्ध आहेत. परंतु एकरी लाखो रुपये द्राक्ष शेतीवर खर्च करणारे शेतकरी जर त्या खर्चामागील विज्ञान, व्यवस्थापन आणि ज्ञान आत्मसात करण्यासाठी दमडीसुद्धा खर्च करण्यास तयार नसतील, तर इतर पिकांतील शेतकरी वर्गाकडून आपण काय अपेक्षा करावी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
(लेखक शेती क्षेत्रात कार्यरत असून ‘द फार्म’ या स्टार्टअपचे सहसंस्थापक आहेत.)


























































