जंतरमंतरवर जेन-झींचा उद्रेक ‘झुरळां’चा सरकारवर हल्ला; धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या! नाही तर आंदोलनाचा वणवा देशभरात पेटेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियातील एका उपरोधिक पोस्टमुळे उभ्या राहिलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाने आज दिल्ली दणाणून सोडली. नीट, सीबीएसईसह विविध केंद्रीय परीक्षांतील गोंधळाचा जाब विचारण्यासाठी हजारो ‘जेन झी’ तरुण झुरळाचे मुखवटे घालून जंतरमंतरवर धडकले. त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्या,’ अशी एकमुखी मागणी आंदोलकांनी केली. ‘आजचे आंदोलन हा फक्त ट्रेलर होता. सात दिवसांत प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास देशभर आंदोलन केले जाईल. त्याची सुरुवात मुंबईतून होईल,’ अशी घोषणा ‘सीजेपी’चे प्रमुख अभिजित दीपके यांनी केली. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहे.

देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बेरोजगारांना झुरळाची उपमा दिली होती. त्याची तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटली. अमेरिकेत असलेल्या अभिजित दीपके या तरुणाने त्यावर उपरोधिक पोस्ट केली. त्यास कोटय़वधी तरुणांचा प्रतिसाद मिळाला आणि त्यातून ‘सीजेपी’ ही चळवळ सुरू झाली. लाखो तरुण देशातील ज्वलंत प्रश्नांवर व्यक्त होत असतानाच केंद्रीय परीक्षांतील घोळाचा जाब विचारण्यासाठी अभिजित दीपके यांनी आंदोलनाची घोषणा केली. आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी दीपके आज स्वतः हिंदुस्थानात आले.

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आंदोलन सुरू झाले. झुरळाचे मुखवटे आणि हातात फुले घेऊन शाळा, महाविद्यालये, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक जंतरमंतरवर धडकले. ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मांचे राजकारण बंद करा…’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. वेळ संपल्याने सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

सहा जणांना अटक

आंदोलनस्थळी गडबड करण्याचा संशय असलेल्या सहा जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. हे सहा जण ‘कॉक्रोच हीट’ हा स्प्रे घेऊन जंतरमंतरवर आले होते. आंदोलक आणि त्यांच्यात राडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

मी अमेरिकेत जाताना माझी आई जेवढी रडली नव्हती, तेवढी मी परत माझ्या घरी येताना रडत होती. तिला भीती होती की हे सरकार मला जेलमध्ये टाकेल. ही भीती केवळ माझ्या आईची नाही. या देशात जो कुणी मुलगा, विद्यार्थी, तरुण राजकारणावर बोलतो, सरकारविरुद्ध बोलतो त्याच्या आईला भीती वाटते. कधीपर्यंत आपण यांना घाबरणार? यांना एकदा दाखवून द्या की आम्ही त्यांना घाबरत नाही. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. – अभिजित दीपके

शिक्षण यंत्रणा सुधारली पाहिजे. ज्यावर आपण अवलंबून असतो, तिथंच बेईमानी झाली तर कोणी काय आशा करायची? या यंत्रणेकडून इमानदारीची मागणी करणं चुकीचं नाही. जबाबदारी म्हणून मंत्र्यांचा राजीनामा मागितलाच पाहिजे. त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची मुलं सरकारी शाळांमध्ये शिकली पाहिजेत तरच बदल होईल. पंतप्रधान ‘परीक्षा पे चर्चा’ करतात ते चांगलं आहे. त्यांनी आता जबाबदारीवरही चर्चा केली पाहिजे. – सोनम वांगचुक