
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी शिवराज्यभिषेक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मंत्री गणेश नाईक, आदिती तटकरे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आदी यावेळी उपस्थित होते. हा पुतळा साडेनऊ मेट्रीक टन कांस्य धातूपासून बनवला असून पुतळ्याची उंची 20 फूट आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिह्यातील या विमानतळाच्या प्रवेशद्वारावर छत्रपतींचा पुतळा उभा करण्याचे काम आठ महिन्यांत पूर्ण झाले आहे. या पुतळ्यामुळे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा आग्रह
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव लागणार आहे. दिबांचे नाव देण्यासाठी सरकार आग्रही आहे. विमानतळाच्या नामांतरणासंदर्भातील सर्व कार्यवाही राज्य सरकारने पूर्ण केली असून याबाबत केंद्र सरकारकडे नियमित पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकार पाठपुरावा करून लवकरच नामकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुतळय़ाच्या अनावरणानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.



























































