
समाजमाध्यमे ही आज अभिव्यक्तीची साधने झाली आहेत, पण या अभिव्यक्तीचा स्वैराचार कधी होतो हे लक्षात येत नाही. एकेकाळी वृत्तपत्रांचे संपादक होते, पण आता समाजमाध्यमांवर व्यक्त होणारा प्रत्येक जण संपादक झाला आहे, अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.
माजी मंत्री, लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेल्या ‘टाइमलाइन’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते. ‘समाजमाध्यमे ही प्रभावी साधने असून डिपफेकचाही भाग झाली आहेत. सैन्य, क्षेपणास्त्रांऐवजी अनेक देशांमध्ये समाजमाध्यमांचा वापर सत्ता उलथवण्यासाठी केला जातो याची अनेक उदाहरणे आहेत. एखाद्याने सोशल मिडीयावर सकारात्मक पोस्ट केली तरी चार फॉलोअर्स नसणाराही जणू काही जाणकार असल्याप्रमाणे त्यावर नकारात्मक पोस्ट टाकत राहतो. अशा नकारात्मकतेने भरलेल्या जगात सकारात्मकतेने राहता येते हा विचार टाइमलाइन हे पुस्तक देते.
याप्रसंगी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, खासदार सुनील तटकरे, प्रफुल पटेल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार, प्रताप सरनाईक, छगन भुजबळ, अतुल सावे, पंकजा मुंडे, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार सचिन अहिर, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. अमित मायदेव, पद्मजा फेणाणी, अच्युत पालव, महापौर रितू तावडे आदी उपस्थित होते.
टाइमलाइन हे पुस्तक म्हणजे राजेंद्रबाबूंनी लिहिलेले नव्या धाटणीचे अद्वितीय पुस्तक आहे. हे पुस्तक समाजमाध्यमांवर व्यक्त होणाऱया लोकांसाठीचे नियम स्पष्ट करणारे मौल्यवान पुस्तक आहे.
ऍड. आशीष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री
प्रत्येक व्यक्तीची, समाजाची आणि राष्ट्राची एक टाइमलाइन असते. त्यामधील काही घटना प्रेरणा देतात, काही विचार करायला भाग पाडतात, तर काही भविष्याचा मार्ग दाखवतात. म्हणूनच या पुस्तकातील एखादे पान तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल.
राजेंद्र दर्डा, माजी मंत्री



























































