
दादर, माहीम आणि माटुंगा परिसरात गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लवकरात लवकर ही समस्या न सुटल्यास हंडा मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
दादरमधील एल. जे. रोड, गोखले रोड, वीर सावरकर मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, भवानी शंकर रोड, रानडे रोड, सेनापती बापट मार्ग, भाऊची गल्ली, प्रभादेवी तसेच जोगेश्वरी वाडी, कवळीवाडी, गोपाळ भुवन वाडी, दत्ता राऊळ मार्ग आदी भागांतील अनेक इमारतींमध्ये अत्यल्प दाबाने पाणी येत आहे. याशिवाय काकासाहेब गाडगीळ मार्ग परिसरातील काही इमारतींना गटारमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत.या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या-नगरसेविका विशाखा राऊत व शाखाप्रमुख अजित कदम यांनी विभागातील नागरिकांसह वरळी हब कार्यालयात जलअभियंता दिलीप पाटील यांच्यासोबत बैठक घेतली.
यावेळी माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, आरती किनरे, दीपाली साने, विजय नागवेकर, किशोर पाटील, शशी फडते, रेश्मा पाटील उपस्थित होते.
बैठकीनंतर जलअभियंता दिलीप पाटील यांनी दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले, मात्र समस्या न सुटल्यास महिलांचा भव्य हंडा मोर्चा महानगरपालिकेच्या कार्यालयावर नेण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.



























































