
पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. शेवटच्या वर्षात शिकणाऱया आणि पर्मनंट रजिस्ट्रेशन नंबर (पीआरएन) ब्लॉक झाल्यामुळे संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांचे पीआरएन त्वरित वैध करून त्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची व परीक्षेस बसण्याची परवानगी देण्याचे आदेश न्यायालयाने विद्यापीठ प्रशासनाला दिले.
सावित्रीबाई फुले विद्यापीठात आर्किटेक्ट, इंजिनीअर व इतर विभागात शेवटच्या वर्गात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी अगोदरच्या काही परीक्षा उत्तीर्ण न केल्याने त्यांचे पीआरएन ब्लॉक करण्यात आले त्यामुळे या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षा देता येत नव्हती. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर व ऍड. ऋषिकेश नाबर, साक्षी इनामदार यांच्या मार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती शाम चांडक व न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांनी खंडपीठाला सांगितले की, याचिकाकर्त्यांचे हे प्रकरण विद्यापीठाच्या 30 मे रोजीच्या परिपत्रकाशी संबधित असून ते या धोरणाअंतर्गत परीक्षेस पात्र आहेत, तर विद्यापीठाच्या वकिलांनी सांगितले की, 16 जूनपासून परीक्षा घेतल्या जाणार आहेत.



























































