
पुणे शहरानजीक असलेल्या आळंदी-मरकळ रस्त्यावरील तुळापूर परिसरातील एका रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या तथाकथित ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १०७ पुरुष आणि ४९ महिलांसह एकूण १५६ जण आढळून आले असून, त्यांपैकी तिघेजण २१ वर्षांखालील असल्याचे निष्पन्न झाले आहे. कारवाईदरम्यान गांजा, बंदी घातलेले हुक्का फ्लेवर आणि ९ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, एकूण सुमारे ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांना तुळापूर परिसरातील एका रिसॉर्टमध्ये विनापरवाना पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या १५ अधिकारी आणि ६५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिसॉर्टवर छापा टाकला. या छाप्यात मोठ्या आवाजात साउंड सिस्टम, मद्यपान आणि धांगडधिंगा सुरू असल्याचे आढळून आले. तपासात संबंधित पार्टीसाठी मिळालेला मद्य परवाना ६ जून रोजी रात्री ११:३० वाजेपर्यंतच वैध असल्याचे उघड झाले; मात्र त्यानंतरही पार्टी सुरूच ठेवण्यात आली होती.
कारवाईदरम्यान सुमारे तीन ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच तीन कप-पॉटमध्ये ठेवलेले दहा प्रकारचे बंदी घातलेले हुक्का फ्लेवरही पोलिसांनी जप्त केले. रिसॉर्टमध्ये सुमारे ९ लाख २२ हजार रुपयांचे मद्य आढळून आले. या पार्टीचे प्रमुख आयोजक म्हणून ‘ब्लेझ एंटरटेन्मेंट’चा आयमन शेख आणि ‘स्टार लाईट एंटरटेन्मेंट’चा यश चौधरी यांची ओळख पटली आहे. त्यांच्यासह संबंधितांवर विविध कायद्यांनुसार कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आळंदी-मरकळ रस्त्यावरील तुळापूर परिसरातील रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे धाड टाकली. या कारवाईत १०७ पुरुष, ४९ महिलांसह एकूण १५६ जण आढळले. गांजा, बंदी घातलेल्या हुक्का फ्लेवरसह 85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. pic.twitter.com/CjWTt3tfJq
— Saamana Online (@SaamanaOnline) June 7, 2026
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे आणि गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्यासह त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आयटी, उच्चशिक्षित तरुण-तरुणींचा भरणा
या पार्टीत सहभागी झालेल्यांमध्ये आयटी आणि इतर क्षेत्रांतील उच्चशिक्षित तरुण-तरुणींचा मोठा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शहरातील हॉटेल्स आणि पब्सवरील नियमांची कडक अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर, अशा प्रकारच्या पार्ट्या शहरालगतच्या ग्रामीण भागातील रिसॉर्ट्समध्ये आयोजित केल्या जात असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
























































