अमेरिकेत तेलंगणातील तरुणाची गोळ्या झाडून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात तेलंगणातील एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंशुल कुंचा (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याला बनावट पिझ्झा डिलिव्हरी ऑर्डरच्या बहाण्याने एका निर्जन ठिकाणी बोलावून डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

अंशुल गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत होता. नोकरीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी तो आठवड्याच्या शेवटी पिझ्झा डिलिव्हरीचे अर्धवेळ कामही करत होता. शनिवारी रात्री त्याला एका पत्त्यावर पिझ्झा पोहोचवण्याची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर फिलाडेल्फियातील एका निर्जन भागातील होती.

डिलिव्हरीसाठी दिलेल्या ठिकाणी पोहोचताच अंशुलवर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. हल्लेखोराने त्याच्या डोक्यात अनेक गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली असून, या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणात केवळ लूटमारीचा हेतू नसून हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. हत्येनंतर अंशुलच्या कोणत्याही मौल्यवान वस्तूंना हात लावण्यात आला नव्हता. त्यामुळे त्याला मुद्दाम लक्ष्य करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

अंशुलची बहीण तन्वी कुंचा हिने सांगितले की, ज्या पत्त्यावर डिलिव्हरीसाठी त्याला पाठवण्यात आले होते, तेथे प्रत्यक्षात कोणताही ग्राहक नव्हता. नंतर चौकशीत ती ऑर्डर बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे अंशुलला जाणीवपूर्वक सापळ्यात ओढून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. तन्वीने म्हटले की, यापूर्वीही अंशुल लुटमारीचा बळी ठरला होता. त्या वेळी त्याचा मोबाईल फोन, सोन्याची चेन आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. मात्र त्यावेळी त्याला कोणतीही शारीरिक इजा झाली नव्हती. दरम्यान, अंशुलचा मृतदेह लवकरात लवकर हिंदुस्थानात आणून अंत्यसंस्कार करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील हिंदुस्थानी समुदायासह तेलंगणातील त्याच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे.

न्यूयॉर्कस्थित हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाने या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, अंशुलच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचेही दूतावासाने स्पष्ट केले आहे.