
मोदी सरकारने महागाईचा आणखी एक झटका दिला आहे असून घरगुती गॅस सिलिंडर आजपासून 29 रुपयांनी महाग झाला आहे. मुंबईत 913 रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता 942 रुपयांमध्ये मिळेल. गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
सरकारने तीन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ केली आहे. यापूर्वी 7 मार्च रोजी 60 रुपयांनी दरवाढ केली होती. तीन महिन्यांत एकूण 89 रुपयांनी गॅस सिलिंडर महाग झाला आहे. इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती वाढ झाली आहे. त्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी दरवाढ केल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे.
एका सिलिंडरमागे 700 रुपयांचे नुकसान
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नैसर्गिक वायूचे दर वाढले आहेत. त्यामुळे एका सिलिंडरमागे 1,600 रुपयांपेक्षा जास्त खर्च सध्या येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एका घरगुती सिलिंडरमागे 700 रुपयांचे नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारकडून तेल कंपन्यांना नुकसानभरपाई देण्यात येते. गेल्या वर्षी 41 हजार 338 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यापाई 30 हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईला मंजुरी देण्यात आली आहे.
नैसर्गिक वायूचे दर 46 टक्क्यांनी वाढले
इराण युद्धामुळे नैसर्गिक वायूचे दर या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत 46 टक्क्यांनी वाढले आहेत. फेब्रुवारीमध्ये ही किंमत 542.50 डॉलर प्रति टन एवढी होती, ती एप्रिलमध्ये 775 डॉलर आणि जून महिन्यात 790 डॉलर प्रति टनपर्यंत पोहोचली आहे. यात प्रोपेन 39 टक्के आणि ब्युटेन 52 टक्क्यांनी महाग झाले आहेत. या किमती सौदी काँट्रक्ट प्राईसने ठरतात. सौदीची कंपनी अरामको हे दर निश्चित करते.
जगात संकट आणि श्रीमंतांची भरभराट – तृणमूलचेही टीकास्त्र
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. जागतिक संकटे येतात त्यावेळी गरीबांची चिंता वाढते आणि श्रीमंतांची भरभराट होते, हेच भाजपचे मॉडेल आहे. स्वतःला ‘विश्वगुरू’ म्हणवणारे आपल्याच देशातील नागरिकांना इंधन दरवाढीच्या झटक्यापासून वाचवू शकत नाहीत, अशी टीका तृणमूल काँग्रेसने केली आहे.
महिनाभरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीदेखील झाले महाग
मोदी सरकारने सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचे झटके देणे सुरू केले आहे. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर 7.50 रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. तसेच सीएनजीदेखील 6 रुपये प्रति किलोने महाग झाला आहे. पेट्रोल आणि डिझेल विक्रीत तेल कंपन्यांना अजूनही नुकसान होत आहे. हा तोटा पेट्रोलवर 11 रुपये आणि डिझेलवर 33 रुपये प्रति लिटर एवढा आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य जनतेचे स्वयंपाकघर भस्म करण्याचा सरकारचा विडा – मल्लिकार्जुन खरगेंची टीका
रविवारी केलेल्या गॅस दरवाढीवरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. एलपीजी दरवाढीच्या आगीत सर्वसामान्य जनतेचे स्वयंपाकघर भस्म करण्याचा विडा मोदी सरकारने उचलला आहे, अशी टीका खरगे यांनी केली. सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमधून त्यांनी मोदी सरकारला इंधन आयातीवर तिखट प्रश्न केले आहेत. 41 देशांमधून सरकार इंधनाची आयात करत आहे, तर त्याचे काय झाले आणि ग्रामीण भागात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा का जाणवत आहे? यूपीए सरकारच्या काळात महागाईवरून गरारोळ करणाऱ्या भाजपच्या सत्तेत गेल्या 12 वर्षांमध्ये 530 रुपयांची दरवाढ झाली आहे. यावर मोदी आणि भाजप नेते शांत का आहेत? ते सिलिंडर घेऊन रस्त्यावर का बसत नाहीत, असे सवाल खरगे यांनी केले आहेत.
टप्प्याटप्प्याने धक्के देण्याचे सत्ताधाऱ्यांचे सूत्र!
सातत्यानं हे दर वाढवतायेत, याचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर होतोय. पंतप्रधानांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय असे सांगितले, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र आहे, त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.




























































