
शहराच्या बाजारपेठेत आणि मुख्य रस्त्यांवर सध्या जांभळाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे, पण यंदा जांभळांचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. परिणामी, दरवाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे महागड्या जांभळांकडे अनेक मध्यमवर्गीयांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे जांभूळ विक्रेते अडचणीत आले आहेत. किरकोळ विक्रीसाठी विक्रेत्यांना अगोदर पैसे मोजावे लागतात. नंतर मात्र वाढीव दरामुळे ग्राहक मिळत नाही. वाढत्या तापमानाचा जांभळांवर परिणाम होत असल्याचे विक्रेते चांगलेच अडचणीत आले आहेत. सध्या उन्हाळी फळ विक्रीचा हंगाम सुरू झाला आहे, पण फळ विक्रेते मात्र मोठ्या संकटात सापडले आहेत. जिह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या पिंपळनेर परिसरातील जांभूळ धुळे शहरात दाखल झाले आहेत. विक्रेत्यांच्या मते, यंदा जांभळाची आवक घटल्याने आणि अपेक्षित विक्री होत नसल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे.






























































