
केंद्र सरकारने केलेली इंधन दरवाढ, वाढलेली महागाई आणि शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ‘महंगाई के अच्छे दिन’ जनआक्रोश आंदोलनाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला सायकलवरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास फेरी मारण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत शहर दणाणून सोडले. ‘महागाई रद्द झालीच पाहिजे’, ‘वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल’, ‘इंधन दरवाढ रद्द करा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. सिलिंडर समोर ठेवून महिलांनी लाटण्यांनी थाळ्या वाजवल्या.
सिलिंडरचे पूजन
शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींनी आंदोलन स्थळी सिलिंडरला हळदी-कुंकू व फुले वाहून सिलिंडरला ओवाळून त्याचे पूजन केले. गॅस दरवाढ एवढी केली की आता सिलिंडर खरेदी करणे परवडणारे न राहिल्याने ठेवूनच देण्याची वेळ आल्याचे रणरागिणींनी सांगितले.
गॅस सिलिंडर घेऊन मारला फेरा
क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी डोक्यावर गॅस सिलिंडर घेऊन फेरा मारला. महिलांनी थाळ्या वाजवून व जोरदार घोषणाबाजी करीत गॅस दरवाढीचा निषेध केला.
कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी
राज्य शासनाने काढलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी केली. फसवी कर्जमाफी करण्यात आली असून हा तर कर्जवसुलीसाठीचा शासन निर्णय आहे. फसवी कर्जमाफी रद्द करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, सातबारा कोरा करा, या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र काळे, जिल्हा संघटक सुनील शिंदे, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, संतोष खेंडके, किशोर कच्छवाह, विठ्ठल बदर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने उपस्थित होते.






























































