
शासकीय कार्यालय म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात ते फायलींचे ढीग, टेबल-खुर्च्या, साहेबांची केबिन आणि दारात उभी असलेली सामान्य माणसांची गर्दी. पण विचार करा, जर हेच कार्यालय थेट तुमच्या गावात, तुमच्या अंगणात आलं तर..? शहापूरच्या दुर्गम भागात असेच काहीसे पाहायला मिळाले. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आपल्या टीमसह शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात धडकले आणि तेथे घोंगडी बैठक घेत गावकऱ्यांचे प्रश्न ऑन दि स्पॉट सोडवत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील ठाणेकरांनी फायलींच्या पलीकडचे प्रशासन पाहून समाधान व्यक्त केले.
ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेने आणि अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या पुढाकारातून शहापूरच्या डोळखांब येथील आदिवासी आणि ग्रामीण भागात ‘घोंगडी बैठक’ घेण्यात आली. दिवसभराच्या शेतीच्या कामानंतर थकलेला शेतकरी आणि गावकरी रात्रीच्या वेळी एका ठिकाणी जमले होते. एरवी रात्रीच्या वेळी शासकीय अधिकारी दुर्गम भागात फिरकत नाहीत, असा एक सर्वसामान्य समज असतो. मात्र या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हेच होते की, ही बैठक रात्रीच्या वेळी थेट गावातच आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी महोदयांचे गावात आगमन होताच पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि नृत्याने ग्रामस्थांनी त्यांचे अत्यंत उत्साहात व आपुलकीने स्वागत केले.






























































