मेलबर्नच्या मूरॅबिन विमानतळावर विमानाला अपघात; सुदैवाने महिला वैमानिक बचावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातील मूरॅबिन विमानतळावर सोमवारी सकाळी एका लहान विमानाला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात किशोरवयीन महिला वैमानिक सुखरुप बचावली आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

द इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, लँडिंगपूर्वी विमानाचे पुढचे चाक (नोझ लँडिंग गिअर) योग्यरित्या न उघडल्यामुळे या सिंगल-इंजिन विमानाला आपत्कालीन बेली लँडिंग करावे लागले होते. तांत्रिक बिघाड असूनही वैमानिकाने विमान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरवले आणि संभाव्य मोठा अपघात टाळला. विमान उतरल्यानंतर महिला वैमानिक सुखरूप बाहेर पडली.

मूरॅबिन विमानतळ मेलबर्नच्या मध्यवर्ती व्यावसायिक क्षेत्रापासून (CBD) आग्नेय दिशेला सुमारे 15 किलोमीटर अंतरावर स्थित एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र आहे. हे विमानतळ ऑस्ट्रेलियातील विमान चालवण्याचे प्रशिक्षण देणारे सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी हजारो विमानांची ये-जा होत असल्याने, वैमानिक प्रशिक्षण आणि सामान्य विमान वाहतूक कार्यांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे.