
चिपळूण तालुक्यातील कामथे गावातील गणपती विसर्जन घाट परिसरातील नदीपात्रात हॉस्पिटलमधील धोकादायक वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कामथे गावातील नदी परिसर हा लोकवस्तीच्या अगदी जवळ असून नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वावर असतो. महिला कपडे धुण्यासाठी, तर शेतकरी जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीकाठाचा वापर करतात. अशा ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
घटनास्थळी वापरलेल्या सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन, सुया तसेच इतर वैद्यकीय साहित्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले. हा कचरा संसर्गजन्य असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीपात्रात जैववैद्यकीय कचरा टाकल्याने पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच कामथे ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्षदा कासार, हरी कासार, तेजस कदम तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी संबंधित प्रकाराबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून दोषी व्यक्ती किंवा संस्थेचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या मते, वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता तो नदीपात्रात टाकणे हे पर्यावरणीय नियमांचे गंभीर उल्लंघन आहे. यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, हा कचरा कोणत्या रुग्णालयातून अथवा संस्थेतून आणण्यात आला याचा शोध घेऊन भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.






























































