
नाशिकसहीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी श्रद्धास्थान असलेल्या पवित्र गोदावरी नदीत गटाराचं पाणी सोडले जात असल्याचे समोर आले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी X वरून नाशिक महापालिका प्रशासनावर जोरदार टीका करतक जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.
”सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर आला असतानाही भाजपा सरकार आणि प्रशासनाला नाशिकची कोणतीच काळजी नाही. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र गोदामाईत आज थेट गटाराचं पाणी सोडलं जातंय. हा हिंदूंच्या आस्थेचा आणि नाशिककरांच्या अस्मितेचा अपमान आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सोमवारी नाशिकमधील शिवसैनिकांनी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोदावरी नदिपात्रात उतरून पाहणी केली व प्रशासनाला जाब विचारला. या पाहणीचे फोटो आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यासोबतच जर येत्या सात दिवसात जर गोदावरीतलं प्रदूषण थांबवलं नाही तर जनआंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.
”नदीच्या स्वच्छतेचा देखील तितकाच गंभीर प्रश्न आहे. यंत्रणा मात्र डोळे मिटून बसली आहे. या विरोधात आज आमच्या नाशिकमधील शिवसैनिकांनी आणि नगरसेवकांनी थेट पाण्यात उतरून प्रशासनाला जाब विचारला. येत्या ७ दिवसांत गोदावरीतलं हे प्रदूषित पाणी बंद झालं नाही, तर संपूर्ण नाशिककरांना सोबत घेऊन महापालिकेला रस्त्यावर उतरवणारे जनआंदोलन केले जाईल”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.





























































