
इंडिया आघाडीची सोमवारी नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा मुद्दा या बैठकीत मांडला. ”आगामी लोकसभा निवडणूकीआधी इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकांसमोर आणावा लागेल”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सर्व संविधानिक संस्था भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. एक देश एक इलेक्शन आणि एक पार्टी एक इलेक्शनच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाची संघ राज्य पद्धती मोडीत काढली जात आहे. इंडिया आघाडीला एकजुटीने हे आव्हान स्वीकारावे लागेल. सगळ्यात आधी इंडिया आघाडीला एका कॉर्डिनेटरची गरज आहे. लोकसभा निवडणूकीला सामोरे जाताना एक चेहरा द्यावा लागेल. लोकांना सांगावे लागेल की होय, हा आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील उद्धव ठाकरे यांच्या मुद्द्याशी सहमत होते, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबतची अधिकृत माहिती देताना प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या अशा प्रकारच्या बैठका नियमीतपणे व्हायला हव्या असे देखील सांगितले.





























































