
जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थांच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कदीम जालना पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ससह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार ८ जून रोजी पहाटे रेल्वे स्थानक परिसरात छत्रपती संभाजीनगर शहरातील हिनानगर परिसरातील एका इसमाकडून एमडी पावडरची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक जे.बी. शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने रेल्वे स्टेशनजवळील मेरिट हॉटेल परिसरात सापळा रचला. यावेळी एका कारमध्ये बसलेल्या संशयित इसमाला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून मानवाच्या शरीरासाठी घातक आणि अमली पदार्थ कायद्यानुसार प्रतिबंधित असलेले एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स आढळून आले. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून १.०५ ग्रॅम एमडी पावडर १५ हजार ७५० रुपये, १.५६ ग्रॅम एमडी पावडर २३ हजार ४०० रुपये, मारुती सुझुकी इको कार ४ लाख रुपये, शाओमी ११ मोबाईल १० हजार रुपयांचा, वजनकाटा १ हजार रुपये, २० झिपलॉक पिशव्या एकूण जप्त मुद्देमाल ४ लाख ५० हजार १५० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात अफरोज जाफर शेख (४५) रा. हीनानगर, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्याच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी अटक केलेल्या आरोपीला सोमवारी 8 जून रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी अधिक वेळ मिळावा, ड्रग्सचा पुरवठा साखळी, खरेदीदार आणि इतर सहआरोपींचा शोध घेता यावा यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली आहे. यावर सुनावणी करत न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. बी. शेवाळ,पोलीस उपनिरीक्षक दिनकर मोरे, पोहेकॉ. सदा राठोड, पोहेकॉ. सचीन चौधरी,पोकॉ.मतीन शेख, पोकों. इम्रान खान,पोकॉ. झेंडे, पोकॉ. कृष्णा चव्हाण, पोकॉ. विलास राऊत, पोकॉ. प्रदीप पवार सर्व नेमणुक कदीम जालना पोलीस ठाणे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि दिनकर मोरे हे करीत आहे. दरम्यान, जालना शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, या प्रकरणाच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






























































