जालन्यातील तडेगाववाडीत शेतरस्त्याच्या वादातून शेतकर्‍याला जबर मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतरस्त्याच्या जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ५० वर्षीय शेतकर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील तडेगाव वाडी येथे ही घटना घडली. मयत रामचंद्र मगन काकरवाल वय (५०)यांच्या नातेवाईकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आक्रोश व्यक्त केला आहे.

भोकरदन तालुक्यातील तडेगाववाडी शिवारात शेतात जाणार्‍या रस्त्याच्या कारणावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संबंधित शेतकर्‍यांवर काही जणांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात काकरवाल यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर जखमी शेतकर्‍याला तातडीने उपचारासाठी भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांच्यावर विशेष उपचारही सुरू होते. विशेष म्हणजे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. मात्र सोमवार रोजी उपचारादरम्यान त्यांची अखेर प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. दरम्यान, मृत शेतकर्‍याच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतरस्त्यासारख्या किरकोळ कारणावरून एका कुटुंबाचा आधार हिरावला गेल्याने गावकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेतरस्त्याच्या वादातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे तडेगाव वाडीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, गावकर्‍यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.