
हिंदुस्थान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात नुकताच एक कसोटी सामना खेळला गेला. हा सामना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) भाग नसला, तरी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मानव सुथारसाठी हा सामना अत्यंत ऐतिहासिक ठरला. त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले आणि एक दोन नव्हे तर एकूण 10 षटके निर्धाव टाकली. तसेच पहिल्या डावात आपल्या फिरकीच्या तालावर त्याने अफगाणिस्तानी फलंदाजांना चांगलच नाचवलं. त्याने 22 षटकात फक्त 33 धावा दिल्या आणि 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या डावातही त्याने महत्त्वपूर्ण एक विकेट घेतली. त्याच्या या धडाकेबाज कामगिरीची दखल ICC ने घेतली असून त्याची आयसीसी रॅकिंगमध्ये धडाकेबाज एन्ट्री झाली आहे. तसेच तो एका मोठ्या परदेशी स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
हिंदुस्थानने कसोटी मालिकेतील हा एकमेव सामना 300 धावांनी जिंकला. टीम इंडियाच्या या विजयामध्ये मानव सुथारचा खारीचा वाटा राहिला. त्याच्या याच दमदार कामगिरीसाठी त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले. पदार्पणाच्या डावातच 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा आणि त्याच सामन्यात ‘सामनावीर’ ठरणाऱ्या हिंदुस्थानच्या मोजक्या खेळाडूंच्या यादीत आता मानव सुथारचा समावेश झाला आहे. या धमाकेदार कामगिरीचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीतही झाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत मानवने थेट 72 व्या स्थानावरून आपले खाते उघडले असून त्याचे रेटिंग 272 झाले आहे.
टीम इंडिया आगामी काळात वनडे आणि टी-20 सामने खेळणार असून, या मालिकांमध्ये मानवचा संघात समावेश नाही. त्यामुळे मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी मानव आता इंग्लंडला रवाना होणार आहे. त्याला प्रतिष्ठेच्या ‘रोथेसे काउंटी चॅम्पियनशिप’ (Rothesay County Championship) कडून खेळण्याचे आमंत्रण आले आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी मानवने आपली संमती दिली आहे. काउंटी क्रिकेटच्या अनुभवामुळे मानवच्या खेळाला आणखी धार येणार असून, आगामी काळात या तरुण खेळाडूकडून क्रीडा जगताला मोठ्या अपेक्षा असणार आहेत.





























































