
महायुती सरकारने शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा मांडली आहे. कर्जमाफी जाहीर करून जाचक अटी लावल्या. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करून पंचनाम्याच्या जोखाडात अडकवले. आता लातूरच्या शेतकऱ्याला मदत म्हणून मरतुकडा बैल देऊन सरकारने त्याची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
वळवाच्या पावसात लातूरमधील देवणी तालुक्यातील बोंबळी गावातील शेतकरी काशीनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज पडून मृत्युमुखी पडला. त्यामुळे गायकवाड यांनी पत्नीला औताला जुंपून शेतात नांगरणी केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची दखल घेत सरकारने गायकवाड दांपत्याला मदत म्हणून गोशाळेतला बैल दिला, परंतु तो बैल मरतुकडा निघाला आहे. पशुवैद्यांनी तपासणी केली तेव्हा तो बैल आजारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गायकवाड यांना आता त्या बैलाच्या उपचाराचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
आजारी बैलावर उपचारासाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्चण्याची वेळ संबंधित शेतकऱयावर आली, त्याप्रमाणेच कर्जमाफीसाठीही सरकारने घातलेल्या अटींमुळे आधी स्वतःकडचे पैसे शेतकऱयांना भरावे लागणार आहेत. यातून या सरकारच्या नियतीतच खोट आहे, हे दिसते. त्यामुळं आमची सरकारला विनंती आहे की, अन्नदात्याला द्यायचं ते हातचं राखून देऊ नका, तर निर्मळ आणि मोकळ्या मनानेच द्या! शेवटी तिजोरी ही जनतेची आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांबाबत असलेली सरकारची अनास्था पुन्हा एकदा दिसून आली आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ‘बैल दिल्यानंतर छान पह्टोसेशन केले गेले. सरकार शेतकऱ्याप्रती किती संवेदनशील आहे याचे व्रेडिट घेतले, पीआर केला… पण हा बैल आजारी निघाला. शेतकरी कर्जमाफीतही सरकारने असाच दिखाऊपणा केला असून या कर्जमाफीचा शेतकऱयांना कोणताही फायदा न होता उलट उर्वरित कर्ज भरण्याचा दबाव शेतकऱ्यांवर आलेला आहे,’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
अन्नदात्याला द्यायचे तर सन्मानाने द्या…विरोधकांकडून टीकेचा भडिमार
मदत म्हणून दिलेल्या बैलाची ही अवस्था प्रसारमाध्यमांतून समोर आली. त्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मदत म्हणून बैल दिला तेव्हा सरकारने त्याचा गाजावाजा केला होता, आता बैल आजारी निघाल्यावर सरकारच्या फसवणुकीचा गाजावाजा होत असल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर टीकेचा भडिमार केला आहे.
अखेर दुसरा बैल दिला
या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी विचारणा केली. त्यावर, संबंधित शेतकऱ्यालाच बाजारात सोबत नेऊन त्यांच्या निवडीप्रमाणे चांगला बैल विकत घेऊन द्यावा, असे निर्देश लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गायकवाड यांना रेणापूरमधील खरोळी येथील बैलबाजारातून बैल खरेदी करून तो स्वाधीन करण्यात आला.






























































