
‘स्टँडअप कॉमेडी शो’मध्ये मृतदेहाचा अश्लील भाषेत अवमान करून वैद्यकीय क्षेत्राची आचारसंहिता पायदळी तुडवणारी महिला डॉ. सेजल पवारला निलंबित करून गुन्हा नोंदवा आणि सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह व्हिडीओ हटवा, अशी मागणी करीत शिवसेना महिला आघाडीकडून आज केईएम रुग्णालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले.
स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या शोमध्ये डॉ. सेजल पवार हिने मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमबाबत अत्यंत घाणेरडे वक्तव्य केले आहे. याचा सर्व स्तरातून जोरदार निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज केईएम रुग्णालयाबाहेर शिवसेनेने आंदोलन केले. मृत व्यक्तीच्या देहाचा असा जाहीर बाजार मांडणाऱया विकृत प्रवृत्तीला कायद्याचा जरब बसणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित महिला डॉक्टर, कार्यक्रमाचे आयोजक व प्रसारक यांच्यावर मृतदेहाची विटंबना, अपमान करणे, जाहीररीत्या अश्लील शब्दांचा वापर करणे, विकृत-आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत केईएमचे अधिष्ठाता डॉ. हरेश पाठक यांना निवदेन देण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव नगरसेवक साईनाथ दुर्गे, नगरसेवक सचिन पडवळ, सचिन पाटील, नगरसेविका ऊर्मिला पांचाळ, भारती पेडणेकर, नगरसेवक किरण तावडे, माधुरी मांजरेकर, सारिका झोरे, शशिकांत झोरे आदी उपस्थित होते.
48 तासांत कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन
या प्रकरणात कॉमेडीच्या नावाखाली वैद्यकीय आचारसंहिता व राष्ट्रीय वैद्यकीय नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे या डॉक्टरची नोंदणी रद्द करण्यासाठी मेडिकल काwन्सिलकडे शिफारस करण्यात यावी आणि या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन 48 तासांत कठोर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भव्य मोर्चा काढून आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि यामुळे कायदा– सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस, केईएम रुग्णालय आणि आयोजक-प्रसारक जबाबदार राहतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.





























































