
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे शिवारात वादळी वाऱ्याने आणि गारांच्या पावसाने मोठे नुकसान झाले. 200 शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाने भरीव मदत द्यावी, अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली परिसरात गारा पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, उभी केळीची झाडे उन्मळून पडली. शेती पिकांसोबतच येथील विजय भोई व बापू मांगू जगताप यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडून भिंती कोसळल्याने मोठे नुकसान झाले.
चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे वादळाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या वादळात परिसरातील अनेक केळीच्या बागा पार उध्वस्त झाल्या आहेत. वादळादरम्यान उंबरखेड येथील शेतकरी उत्तमराव रामराव महाजन यांच्या शेतातील 25 वर्षांपूर्वीचे जुने पिंपळाचे झाड अचानक उन्मळून गाईंच्या शेडवर कोसळले. या दुर्घटनेत शेडखाली जवळपास चार गाई अडकून पडल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी कटर आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या तोडून गाईंना सुखरूप बाहेर काढले. या घटनेत गाई जखमी झाल्या असून शेडचे पूर्ण नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच गावच्या कोतवालांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
वरखेडे परिसरातील चिंचनाल्याजवळ एक मोठे झाड मुख्य रस्त्यावर कोसळले. हे झाड थेट रस्त्याच्या मधोमध पडल्यामुळे “येवला-एरंडोल’ मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली.





























































