ना माफी, ना खेद…, आपले पंतप्रधान अमेरिकेचे गुलाम बनलेत का? राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेने ओमानच्या समुद्रात हिंदुस्थानी जहाजांवर केलेल्या हल्ल्यात तीन हिंदुस्थानी खलाशांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमेरिकेने माफी मागण्याऐवजी तुम्हाला आमचे आदेश पाळावेच लागतील. नाकेबंदी मोडाल तर कारवाई होणारच,’ असे ठणकावून सांगितले. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. आपले पंतप्रधान देशाचा अपमान करणाऱ्यांच्या आधीन गेले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत अमेरिकेच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकन लष्कराच्या हल्ल्यांत तीन हिंदुस्थानी खलाशांचा मृत्यू होऊन अनेक तास उलटून गेले. मात्र तरीही अमेरिकेकडून ना खेद व्यक्त करण्यात आला, ना माफी मागण्यात आली. अमेरिकेने हिंदुस्थानला आदेश देणे कायम ठेवले आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अमेरिकेने हिंदुस्थानला त्यांचे आदेश पाळावे लागतील असे ठणकावले. कोणताही स्वतंत्र देश अशी भाषा कधीच खपवून घेणार नाही, पण आपले तडजोड करणारे पंतप्रधान सध्या शांत असून ते एखाद्या आज्ञाधारक नोकरासारखे अमेरिकेचे ऐकून त्यांच्या आदेशाचे पालन करीत आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली.

सध्याचे पंतप्रधान देशाच्या सन्मानाचे रक्षण करू शकत नाहीत, कारण जे लोक देशाचा अपमान करत आहेत, पंतप्रधान त्यांच्याच अधीन जातात, असा आरोपही त्यांनी केला.

अमेरिकेने हिंदुस्थानला दम भरला, आमचे आदेश पाळावेच लागतील! मोदी सरकारची ट्रम्प प्रशासनाकडून गोची