अमेरिकेने हिंदुस्थानची माफी मागायलाच हवी; व्यापारी जहाजावरील हल्ल्यावरून पवन खेरा यांचा सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेने ओमानच्या समुद्रात व्यापारी जहाजावर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये तीन हिंदुस्थानी खलाशांचा मृत्यू झाला असून देशभरात संतापाची लाट आहे. या हल्ल्यावरून काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केंद्र सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. ANI शी बोलताना पवन खेरा म्हणाले की, या गंभीर घटनेनंतर हिंदुस्थानने अमेरिकेकडून अधिकृत माफीची मागणी करायला हवी होती. मात्र, हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यावर घेतलेली भूमिका अत्यंत मवाळ असून त्यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे केवळ एक ‘सौम्य फटकार’ आहे, जी अशा संवेदनशील प्रकरणात पुरेशी नाही.

पवन खेरा यांनी आंतरराष्ट्रीय नियमांचा हवाला देत अमेरिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “कोणत्याही संघर्षामध्ये तिसऱ्या देशाच्या व्यापारी जहाजावर हल्ला केला जाऊ शकत नाही. यासाठी ‘सॅन रेमो मॅन्युअल’ 1949 चे जिनेव्हा कन्व्हेन्शन आणि इतर अतिरिक्त प्रोटोकॉल्सचे आंतरराष्ट्रीय नियम लागू होतात. अमेरिकेने आपल्या निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागायलाच हवी. परंतु, जयशंकर एवढी बचावात्मक भूमिका का घेत आहेत? आपण आपले लोक गमावले आहेत, तरीही आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानहानी सहन करावी लागत आहे.” अस पवन खेरा म्हणाले.

ना माफी, ना खेद…, आपले पंतप्रधान अमेरिकेचे गुलाम बनलेत का? राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

याच मुद्द्यावरून काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनीही अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या उद्धट वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. रुबिओ यांच्या विधानात हिंदुस्थानी खलाशांच्या मृत्यूबाबत कोणताही पश्चात्ताप, सहानुभूती किंवा खेद दिसून आला नसल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. अमेरिकेची ही भाषा मित्रदेशाला शोभणारी नसून, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी या अरेरावीला चोख प्रत्युत्तर दिले आहे की नाही, हे स्पष्ट करण्यासाठी या संभाषणाचा सविस्तर तपशील जाहीर करावा, अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी केली आहे.