
सोन्यावरील सीमाशुल्क दुप्पट करून १५ टक्के केल्यावर हिंदुस्थानची सोन्याची आयात सुमारे ७० टक्क्यांनी घटून २५ ते ३० टनांवर आली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.
१३ मे पासून लागू झालेल्या नियमानुसार, सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून वाढवून १५ टक्के करण्यात आले आहे.
‘आयात शुल्कात वाढ केल्यावर एका महिन्यात सोन्याची आयात पूर्वीच्या ७५ ते १०० टनांवरून घटून २५ ते ३० टनांवर आली आहे’, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोने ग्राहक असलेल्या हिंदुस्थानात सोन्याची आयात ही प्रामुख्याने सराफ उद्योगाच्या मागणीमुळे होते. अशा आयातीमुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन देशाबाहेर जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याची खरेदी मर्यादित करण्याचे आणि अनावश्यक परकीय चलनाची उधळपट्टी रोखण्यासाठी काटकसरीचे उपाय अवलंबण्याचे जाहीर आवाहन केल्यानंतर ही शुल्क वाढ करण्यात आली आहे.
देशाच्या एकूण आयातीपैकी ५ टक्क्यांहून अधिक वाटा सोन्याचा आहे.
आखातील परिस्थितीमुळे हिंदुस्थानचे एकूण आयात बिल खूप वाढण्याची शक्यता आहे, आणि म्हणूनच सरकारला खनिज तेल, खते, औद्योगिक कच्चा माल आणि भांडवली वस्तू यांसारख्या आर्थिक घडामोडींना आणि अन्न सुरक्षेला थेट पाठिंबा देणाऱ्या आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी परकीय चलनाच्या खर्चाला प्राधान्य द्यायचे आहे.



























































