सत्ताधारी हतबल… नाले गाळ-कचऱ्याने तुडुंब; नालेसफाईचे थर्ड पार्टी ऑडिट होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिका प्रशासनाकडून मुंबईत 100 टक्क्यांवर नालेसफाईची आकडेवारी दिली जात असताना प्रत्यक्षात मात्र अनेक नाले अजूनही गाळ-कचऱ्याने तुडुंब भरले असल्याचे खुद्द सत्ताधारीच सांगत असल्याने त्यांची प्रशासनासमोर हतबलता दिसून आली. विरोधकांनीही नालेसफाईची आकडेवारी फसवी असल्याचे सांगत पावसाळ्यात मुंबई तुंबल्यास सत्ताधारी जबाबदार राहतील अशी भूमिका मांडली. अखेर सत्ताधारी आणि विरोधकांच्या मागणीनुसार नालेसफाईच्या संपूर्ण कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येईल, अशी घोषणा अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी महासभेत केली.

पालिकेच्या महासभेत आज सभागृह नेते भाजपचे गणेश खणकर यांनी नालेसफाईचा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनाच्या आकडेवारीची पोलखोल केली. अनेक नाले अजूनही तुंबलेले असून पंत्राटदारांची मनमानी सुरू असल्याचा आरोप त्यांनी करीत नालेसफाईच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची सूचना मांडली. यावेळी विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील अजूनही अनेक नाले कचरा-गाळाने तुंबलेले असल्याचे सांगत प्रशासनाच्या आकडेवारीची पोलखोल केली. प्रत्यक्ष पाहणीत नाल्यांमधील गाळ काढला नसल्याचे सांगत त्यांनी नाल्यांची नावेच जाहीर केली. एफ दक्षिण विभाग, एफ उत्तर विभागातील दिन बंधू नगर नाला, रावळी लो लेव्हल नाला, जे. के. केमिकल नाला अजूनही तुडुंब असल्याचे पाहणीत आढळल्याचे त्या म्हणाल्या. शिवसेनेचे अंकित प्रभू यांनीदेखील नालेसफाईच्या दाव्यावर जोरदार हल्ला केला. काँग्रेसचे आश्रफ आझमी, मनसेचे यशवंत किल्लेदार आदींनीदेखील नालेसफाईची आकडेवारी फसवी असल्याचे सांगितले. किल्लेदार यांनी मुंबईतील भरलेल्या नाल्यांचे पह्टोच यावेळी दाखवले.

नाल्यांवर जाळ्या बसवणार

नालेसफाई केल्यानंतरही वारंवार टाकला जाणारा कचरा आणि तरंगता कचरा ही नालेसफाईच्या कामातील मुख्य अडचण असून त्यामुळे वारंवार नालेसफाई केली तरी कचरा आढळून येतो, असे अतिरिक्त आयुक्त बांगर म्हणाले. यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर काही नाल्यांवर जाळ्या बसवण्यात आल्या असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. हाच उपक्रम आगामी काळात बहुसंख्य नाल्यांवर राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नालेसफाईवर सध्या जो सुमारे 290 कोटींचा खर्च होत आहे तोदेखील कमी होईल, असा विश्वासही बांगर यांनी व्यक्त केला.