
शिवसेनेचे भांडुप विभागातील प्रभाग क्र. 111 चे नगरसेवक दीपक सावंत यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा आज महासभेत महापौर रितू तावडे यांनी केली. यामुळे शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ 1 ने कमी होऊन 64 झाले आहे.
सहाय्यक निवडणूक आणि नगर शुल्क अधिकारी यांनी 18 जून रोजी महापालिका सचिव यांना याबाबत पत्र दिले आहे. यामध्ये दीपक सावंत यांनी 27 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक अधिकारी यांना सादर केलेले जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी यांनी 15 जून रोजी अवैध ठरवल्याचे म्हटले आहे. मात्र दीपक सावंत यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला विरोध केला. या प्रकरणी सभागृहात घोषणा करण्याची एवढी घाई का केली जाते, असा सवाल उपस्थित केला. जात पडताळणीसाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. सदर प्रकरण न्यायालयात गेले असून न्यायालयाचा निकाल येईपर्यंत पालिकेने घाई करून निर्णय घेऊ नये. तोपर्यंत वाट बघावी, अशी सूचनादेखील किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केली.




























































