
फिफा विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने दमदार सुरुवात करत बलाढय़ क्रोएशियाचा 4-2 गोलफरकाने पराभव केला. हॅरी केनच्या दोन गोलांसह ज्युड बेलिंगहॅम आणि मार्कस रॅशफोर्ड यांनी प्रत्येकी एक गोल करत इंग्लंडला महत्त्वाचा विजय मिळवून दिला.
थॉमस टुशेल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱया इंग्लंडने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. मात्र क्रोएशियानेही जोरदार प्रतिकार करत पहिल्या सत्रात सामना 2-2 असा बरोबरीत ठेवला. इंग्लंडकडून हॅरी केनने दोन गोल झळकावले, तर क्रोएशियासाठी मार्टिन बातुरिना आणि पेटार मुसा यांनी प्रत्युत्तर दिले.
दुसऱ्या सत्रात मात्र ज्युड बेलिंगहॅमने आपल्या अफाट कौशल्याची झलक दाखवली. इलियट अँडरसनच्या पासवर त्याने वेगवान धाव घेत बचावफळीला चकवत अप्रतिम गोल केला आणि इंग्लंडला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर इंग्लंडने सामन्यावर वर्चस्व गाजवले. बेलिंगहॅम, केन, राईस आणि अँथनी गॉर्डन यांनी अनेक संधी निर्माण केल्या. अखेर सामन्याच्या उत्तरार्धात बदली खेळाडू बुकार्यो साकाच्या पासवर मार्कस रॅशफोर्डने अचूक फटका मारत चौथा गोल नोंदवला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.


























































