महाकाय जलकुंभाखाली बेकायदा घरे; 20 लाख लिटर पाण्याच्या साठ्याची टांगती तलवार, KDMC चे अधिकारी झोपा काढताहेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कल्याण-डोंबिवलीत अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी वाढली आहे. भूमाफिया आणि चाळमाफियांनी शासकीय भूखंडही गिळले आहेत. आता तर २० लाख लिटर क्षमतेपेक्षा जास्त असलेल्या जलकुंभाखालीसुद्धा बेकायदा घरे थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणच्या चिकणघर परिसरात ही घरे असून एखादी दुर्घटना घडल्यावर केडीएमसीचे झोपा काढत असलेले अधिकारी जागे होणार का, असा संताप व्यक्त होत आहे.

पिण्याच्या पाण्याच्या टाकीखाली कोणतीही मानवी वस्ती असू नये, असा स्पष्ट नियम असतानाही कल्याणमधील चिकणघर परिसरात महापालिकेच्या पाण्याच्या टाकीखालीच घरे बांधण्यात आली आहेत. या गंभीर प्रकरणात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक संकेश भोईर यांनी केला आहे. विशेष म्हणजे महापौर हर्षाली चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिल्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या भोईर यांनी आज प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रभाग क्षेत्र अधिकारी दोषी

पाण्याच्या टाकीखाली घरे बांधलीच कशी? प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी याप्रकरणी दोषी आहेत. हे काम कुणाच्या आशीर्वादाने झाले याची सखोल चौकशी होण्याची मागणी नगरसेवक संकेश भोईर यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलनचा इशाराही त्यांनी दिला आहे.