हर्षित राणाचे कमबॅक; अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियात समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियात सामील झाला आहे, अशी घोषणा बीसीसीआयने शुक्रवारी केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टीम इंडियाच्या टी-२० वर्ल्ड कप सराव सामन्यादरम्यान हर्षितच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाली होती आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती; या दुखापतीतून सावरत तो शनिवारी येथे होणाऱ्या मालिकेच्या अंतिम सामन्यापूर्वी संघात दाखल झाला आहे.

टीम इंडियाने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी दणदणीत आघाडी घेत मालिका आधीच आपल्या नावावर केली आहे.

‘हर्षित राणा याने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये आपले रिहॅब पूर्ण केले असून, तो चेन्नईत एकदिवसीय संघात सामील झाला आहे’, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या दुखापतीमुळे हर्षितला टी-२० वर्ल्ड कप आणि इंडियन प्रीमियर लीग या दोन्ही स्पर्धांना मुकावे लागले होते.