साय-फाय – जागतिक तापमानवाढीवर शास्त्रज्ञांचा तोडगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर, [email protected]

यंदाचा उन्हाळा आपण सगळ्यांनीच चांगलाच अनुभवला आहे. भूगर्भातील पाण्याची घटणारी पातळी आणि हवामानातील कमालीचे बदल यामुळे निसर्गाचा ताळेबंद पार विस्कटून गेलाय. आपण शहरात एसीमध्ये बसून राहतो, पण निसर्ग वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला धोक्याचे संकेत देत असतो. जागतिक तापमानवाढीचे हे संकट दिवसेंदिवस अधिक कडक होत चालले असून हवेतील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण हे त्यामागचे मुख्य कारण आहे. हा कार्बन हवेतून शोषून घेण्यासाठी जगभरात अनेक महागडी तंत्रज्ञान वापरली जात आहेत, पण नुकताच स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध  ETH zurich च्या शास्त्रज्ञांनी यावर एक असा भन्नाट आणि स्वस्त उपाय शोधला आहे, जो वाचून निसर्गाच्या न्यायबुद्धीची थक्क करणारी बाजू समोर येते.

निसर्गाचा एक कडक नियम आहे, तिथे कोणतीही गोष्ट वाया जात नाही. एकाचा कचरा हा दुसऱ्यासाठी जीवन ठरू शकतो. शास्त्रज्ञांनी नेमका याच तत्त्वाचा वापर करून एक नवा जागतिक ब्रेकथ्रू मिळवला आहे. त्यांनी दुग्धजन्य पदार्थ आणि टोफू म्हणजे सोयाबीनचे पनीर बनवताना वाया जाणाऱ्या टाकाऊ प्रथिनांचा वापर करून हवेतील कार्बन शोषून घेणारा एक अनोखा सापळा तयार केला आहे. एका बाजूला जगभरात दररोज लाखो टन अन्न वाया जाते आणि दुसरीकडे कार्बनचे प्रमाण वाढून पृथ्वी होरपळत आहे. शास्त्रज्ञांनी या दोन मोठय़ा जागतिक संकटांना समोरासमोर लढवून एक झीरो वेस्ट मॉडेल जगासमोर आणले आहे.

या तंत्रज्ञानामागील विज्ञान समजून घेतले तर शास्त्रज्ञांच्या बुद्धीची दाद द्यावी लागेल. अन्न प्रक्रियेदरम्यान जो टाकाऊ द्रव उरतो, त्यातून ही प्रथिने वेगळी केली जातात आणि त्यांचे अतिशय बारीक धागे बनवले जातात. हे प्रथिनांचे धागे पोटॅशियम हायड्रॉक्साईडसोबत एकत्र करून साधारण साडेआठ मिलिमीटर आकाराचे लहान स्पंजसारखे मणी तयार केले जातात. हे मणी दिसायला अत्यंत साधे असले तरी त्यांचे काम मात्र मोठे वजनदार आहे. हे मणी जसे हवेच्या संपर्कात येतात, तसे ते एखाद्या कडक स्पंजसारखे हवेतील कार्बन डायऑक्साईड स्वतमध्ये शोषून घेतात. कार्बन शोषून घेतल्यानंतर त्याचे रूपांतर एका सुरक्षित रासायनिक मिठात होते, ज्यामुळे हवेतील घातक वायू कायमचा कोंडला जातो.

या नव्या शोधाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे या प्रक्रियेला लागणारी अत्यंत कमी ऊर्जा. यापूर्वी हवेतील कार्बन वेगळा करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचे कारखाने उभे करावे लागायचे आणि शोषलेला कार्बन बाहेर काढण्यासाठी प्रचंड उष्णता द्यावी लागायची, ज्यामुळे उलट प्रदूषणच वाढायचे, परंतु प्रथिनांच्या या मण्यांमधून कार्बन वेगळा करण्यासाठी कोणत्याही अवाढव्य ऊर्जेची किंवा उष्णतेची गरज भासत नाही. सामान्य खोलीच्या तापमानाला फक्त एका सौम्य अॅसिडची फवारणी करून हा कार्बन अगदी आरामात गोळा करता येतो. त्यामुळे विजेची आणि पैशांची अफाट बचत होते.

हे प्रथिनांचे मणी एकदा वापरून फेकून द्यायचे नसतात, तर त्यांचा अनेक वेळा पुनर्वापर करता येतो. जेव्हा अनेक वेळा वापरून या मण्यांची कार्बन शोषण्याची क्षमता पूर्णपणे संपून जाईल तेव्हादेखील ते पर्यावरणावर भार ठरत नाहीत. हे मणी पूर्णपणे सेंद्रिय आणि नैसर्गिक घटकांपासून बनलेले असल्यामुळे मातीत टाकल्यास त्यांचे विघटन होते. त्यामुळे क्षमता संपलेले हे मणी थेट शेतासाठी उत्तम खत म्हणून वापरता येतात किंवा त्यापासून बायोफ्युएल म्हणजेच जैविक इंधन बनवता येते. थोडक्यात सांगायचे तर सुरुवातीला जो कचरा होता, तो हवेतील प्रदूषण संपवून शेवटी पिकांसाठी अमृत बनून मातीत परत जातो.

टाकाऊ अन्नाचा हा अनोखा वापर केवळ विज्ञानाचा चमत्कार नाही, तर भविष्यातील कोरडय़ा आणि कडक कालखंडाविरुद्ध लढण्यासाठी मानवाच्या हाती लागलेले एक प्रभावी शस्त्र आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात संसाधनांचा वापर किती जपून करायला हवा, हाच धडा यातून मिळतो. शास्त्रज्ञांच्या या अद्भुत शोधामुळे आता जागतिक तापमानवाढीच्या समस्येवर यशस्वी उपाय मिळण्याची आशा निर्माण झाली असून हा टाकाऊ अन्नाचा सापळा पृथ्वीला नवजीवन देण्यासाठी नक्कीच मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.