
>> शूचिता नांदापूरकर–फडके
गाभूळलेली चिंच… आधीच मोठी चविष्ट… तिखट-मीठ-गुळाची जोड दिल्यावर जी चव अनुभवाल, तिला नाही तोड. चाखतमाखत, मिटक्या मारत ती खावी लागते… प्रत्येक वेळेस गोडी वाढते, लज्जत येते, लसिकाग्रंथी कार्यरत होत पाझरतात, रुक्षता घालवतात. नेमकी हीच अनुभूती येते ‘हिंगणमिठ्ठा’ वाचताना.
गेल्या वर्षी ‘पुस्तकप्रेमी’ समूहात या पुस्तकाचा परिचय लिहून आला. नावापासूनच वेगळं वाटलं आणि पुस्तक लगेच मागवलं. मे 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची अवघ्या अडीच वर्षांत तिसरी आवृत्ती येईल आणि त्यावर आपण प्रतिक्रिया लिहू, असा विचारही केला नव्हता. कृष्णा दिवटे यांच्यामुळे तो योग जुळून आला. या पुस्तकाच्या आणखीही काही आवृत्त्या सहज निघतील ही खात्री आहे. कारण… हा आठवणींचा धांडोळा आहे, स्मृतिरंजन आहे, बालपणीचा प्रवास आहे आणि या साऱयाला जीवन विचारांची सुरेख जोड आहे. कारण हे पुस्तक वाचताना आपल्याला परिचित अशा विसाव्या शतकातल्या जागा पावलोपावली नजरेस पडतात. आपली स्मृतिकोठारं झडझडून झटकली जातात.
कारण कुठेही क्लिष्ट, शिष्ट, गर्विष्ठपणा नाही. दुर्बोध भाषा नाही, उपदेशांचे डोस नाहीत. आहे तो सहज, सुबोध शब्दप्रवाह. तोही सच्चा. कल्पनेच्या भराऱया नाहीत. आहे ते संपन्न आयुष्याबद्दलचं लेखन आणि त्यातही लहानपणावर मोठा भर. ‘दिल्ली ते गल्ली’ हे 15-17 पानी लेखन वगळता इतर सर्व विषयांचा पसारा नाहीच कसा. सारं कसं सुटसुटीत तरीही हुरहुर लावणारं, कातर करणारं, विचारप्रवृत्त करणारं आणि तरीही आपल्याही सुखद स्मृती जागं करणारं, बालपणात पोहोचवणारं.
तर असा हा कारणप्रपंच पुरेसा आहे हे पुस्तक वाचायला. याची खासीयत म्हणजे कित्येक प्रसंग वाचताना आपल्याला आपला पूर्वकाळ आठवतो आणि ‘हिंगणमिठ्ठा’ची खुमारी वाढवतो. मजा म्हणजे नुसतं वाचन करताना सहज हातात पेन्सिल येते आणि आपण महत्त्वाची वाक्यं खुणा करत जातो.
साध्या कडकलक्ष्मीच्या प्रसंगातूनही लेखक जीवनाचं वास्तव समोर आणत म्हणतात, “पोटासाठी स्वतच्या अंगावर फटकारे उडवत बघ्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी मात्र तो समाधानाने भरभरून आशीर्वाद द्यायचा.” दरवेशाबद्दल लिहितात, ‘दारोदार खेळ करून दयेची याचना करत जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो.’ अस्वलाच्या नाकातली वेसण पाहून ते लिहितात, ‘माणूसदेखील अशा बऱयाच दृश्य-अदृश्य जोखडांचा गुलाम आहे. मोठे होऊ तसे जबाबदाऱयांची वेसण असहाय करते.’
तरीही, हे पुस्तक खुसखुशीत आहे. खास ‘पंचगंगेच्या तीरावरची संस्कृती आणि जुनी बुधवार पेठ’ इथे आपण रमतो. संक्रांत, होळी, दिवाळी असे सण असोत, पतंग उडवणं असो, शाळेतले गुरुजी असोत, गल्लीतले शेजारी असोत, शिवाजी महाराज असोत, शेजारधर्म असो, अगदी बारसं ते अंत्यक्रिया असो त्यांची लेखणी मोठय़ा कुशलतेने सगळ्यांचा परामर्श घेते आणि आपल्यासमोर जणू चलचित्रपट उभा करते. तसेच अनेक नवीन शब्द आपल्याला समजतात हा बोनस.
लिहिण्यासारखं खूप आहे. कैक पानांवर मी खुणा केल्या आहेत, टिपणं काढली आहेत; परंतु म्हणतात ना, ‘एक तरी ओवी अनुभवावी’, त्याच धर्तीवर म्हणेन, ‘एक तरी लेख वाचावा.’ कारण… एकदा वाचून समाधान होणारच नाही. पूर्ण पुस्तक वाचाल आणि मग वर्तमानकाळ स्तब्ध झालेला असताना, भविष्याची कल्पना नसताना, भूतकाळातल्या सुखद आठवणींत तुम्हीही रममाण व्हाल.
हिंगणमिठ्ठा
लेखक ः उत्तम फराकटे
प्रकाशन ः भाग्यश्री प्रकाशन
पृष्ठे ः 220, ह किंमत ः रु. 300

























































