
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी महाराष्ट्रात संघर्ष करावा लागला हे दुर्दैव आहे, अशी खंत व्यक्त करत असे विचित्र राज्यकर्ते लाभल्यानंतर दुसरे काय होणार आहे, असा जबरदस्त टोलाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला हाणला.
ए. आय. एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड प्रवेशद्वार, गेट नंबर 5 जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंवरीस्थित पुतळ्याचे व त्यासमोर साकारलेल्या शिवसृष्टीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिवसृष्टी उभारण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी कौतुक केले. संघर्षाला न घाबरता, सरकारच्या दडपशाहीला न घाबरता, स्थानीय लोकाधिकार समितीने हा लढा दिला आणि तो यशस्वी करून दाखवला याचा अभिमान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्व्हिसेसच्या अदानी व्यवस्थापनाचे बलबीर भाटिया, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणारे सुप्रसिद्ध मूर्तिकार नितीन मिस्त्राr, शिवसृष्टी साकारणारे चित्रकार जीत माने व अमित साखरकर यांचा सत्कार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळ्याला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, आमदार ऍड. अनिल परब, आमदार महेश सावंत, नगरसेविका ऋतुजा लटके, महासंघाचे कार्याध्यक्ष आणि एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष विलास पोतनीस, सरचिटणीस प्रदीप मयेकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष उल्हास बिले, उपाध्यक्ष शरद एक्के, सुधाकर नर, शरद जाधव, ललित साने, राजेंद्र राऊत, हेमंत सावंत, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम, युवासेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर, विभागप्रमुख प्रमोद सावंत, सोमनाथ सांगळे, मराठी क्रांती मोर्चाचे मुख्य राज्य समन्वयक वीरेंद्र पवार, किरण सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस प्रशांत सावंत, सहसरचिटणीस बाळासाहेब कांबळे, सहसरचिटणीस प्रवीण शिंदे, कार्याध्यक्ष सुरेश शिंदे, गोपी कदम, दिलीप पिंगे, सलील कोटकर, उपाध्यक्ष अजित चव्हाण, अमोल कदम, दीपक शिंदे, उमेश सानप, नीलेश लांजेकर, रामकृष्ण आंबेकर, सुनील आढाव, विपुल रणखांबे, प्रवीण जाधव, सतीश रेडकर, गायक धनराज सरतापे आदींनी मेहनत घेतली.
कानाखाली आवाज काढला की दरवाजा उघडतो
एअर इंडियाची दारे उघडताना स्थानीय लोकाधिकार समितीच होती. दरवाजा उघडण्यासाठी आपण टकटक करतो. मात्र तुम्ही कानाखाली आवाज काढलात. म्हणजे टकटक करून दरवाजा उघडला जात नसेल तर कानाखाली आवाज काढल्यावर दरवाजा उघडला जातो हे तुम्ही दाखवून दिलेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
गद्दार गडप होतील
काल सर्व जुने-नवे कार्यकर्ते एकजुटीने पुढे आले. त्यामुळे सर्वत्र जणू शिवसागरच उसळला आहे. त्यामुळे जी काय त्सुनामी येईल त्यात हे गद्दार कुठे कसे गडप होतील हे कळणार नाही, असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. यावेळी उपस्थितांमधून शिवसेना झिंदाबाद असा एकच नारा उसळला.
संघर्ष सृष्टी उभारायला हवी
अन्यायाला लाथ मारण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला आहे. स्थानिय लोकाधिकार समितीने अनेक संघर्षाशी लढा देऊन काम केले आहे. यापुढेही संघर्षाला गाडून लोकाधिकार समिती आपले काम सुरू ठेवेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवरायांच्या पुतळ्यामागचा संघर्ष बहुतांश लोकांना माहिती नाही. त्यामुळे जशी शिवसृष्टी येथे उभारली गेली आहे तशीच संघर्षसृष्टी येथे उभारायला हवी, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.




























































