
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना शिवसेनेचे सहा खासदार भाजपमध्ये न जाता शिंदे गटात का गेले? 2029च्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पंतप्रधान करण्यासाठी फोडाफोडी सुरू आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून भाजपवर हल्ला चढवला.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे यांनी सद्य परिस्थितीवर अतिशय परखडपणे भाष्य केले. खासदारांच्या गद्दारीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, राज्यात शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, नीट पेपरफुटी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी असे गंभीर प्रश्न असताना राजकीय नेते आमदार-खासदार फोडण्यात व्यस्त आहेत. खासदारांना फोडून अमित शहा यांची 2029च्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. भाजपमधून जर आपल्याला विरोध झाला तर इतर गटांमधून पाठिंबा मिळण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. भाजपमध्येही प्रचंड अंतर्गत गोंधळ सुरू आहे. पण मोदींमुळे ते शांत आहेत. येत्या वर्षभरात राज्यात किंवा देशातही मोठे बदल होऊ शकत असल्याची चर्चा असल्याचे ते म्हणाले.
जैन मुनींकडून भाजपचे राजकारण
जैन धर्माबद्दल आम्हाला आदर आहे. पण आत्ताच पांढऱ्या पट्ट्या का? काही जैन मुनी हे भाजपचे राजकारण करीत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. कुरळ्या केसांची दाढी घेऊन फिरणाऱया एकाला तर मुनीही म्हणत नाहीत. कधी कबुतरांचा वाद तर आता पांढऱ्या पट्ट्यांचा वाद. सोसायटय़ांमध्ये पांढरे पट्टे कसे मारता? आम्हाला वाद नकोत. पण वाद उकरून काढणार असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू, मराठी माणसाचं मनगट कधी पाहिले आहे का? असा इशारा त्यांनी दिला.
‘एसआयआर’कडे लक्ष ठेवा
सत्तेकडे जाण्याचा मार्ग मतदारयादीतून जातो. खोटय़ा मतदारांवर आपण हरकत घेतली पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची 27 लाख मते काढली गेली. ममता बॅनर्जी पडल्या. तिथे केजरीवाल पडले. समोरचे कसे खेळ खेळतात याचे भान नसेल तर निवडणुका लढवून उपयोग नाही. त्यामुळे गाफील राहू नका. एसआयआर जनगणनेकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.



























































