
श्रीलंकेत सध्या टीम इंडिया-ए आणि श्रीलंका-ए यांच्यामध्ये तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्याची लढाई सुरू आहे. या संपूर्ण मालिकेत वैभव सूर्यवंशीची बॅट अगदी शांत राहिली. त्याच्याकडून सर्वांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याचा खेळ अगदीच सुमार राहिला. त्याच्यावर टीकाही झाली. मात्र, त्याने या सर्व टीकाकारांना चोख उत्तर देत अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केलीये. संपूर्ण मालिकेत शांत असलेलं हे ‘वैभव’ नावाच वादळ अखेर अंतिम सामन्यात चांगलंच गोंगावलं आणि या वादळात श्रीलंकेच्या बत्त्या गुल झाल्या. त्याने केवळ 26 चेंडूंमध्ये 8 षटकार आणि 10 चौकरांच्या मदतीने 94 धावांची कडक सलामी दिली. या ऐतिहासिक खेळीदरम्यान वैभवने मैदानात पाऊल ठेवल्यापासून थेट मैदानाबाहेर जाईपर्यंत 5 मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
वैभव सूर्यवंशीने या सामन्यात अवघ्या 11 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने हिंदुस्थानचा दिग्गज फलंदाज युवराज सिंहचा 2007 मधील 12 चेंडूंत अर्धशतक झळकावण्याचा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढला आणि तो हिंदुस्थानसाठी तसेच लिस्ट ‘ए’ क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज बनला. विशेष म्हणजे, हे अर्धशतक पूर्ण करेपर्यंत वैभवने धावून एकही धाव घेतली नव्हती. त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारत आपले पहिले 50 रन केवळ चौकार-षटकारांच्या जोरावरच वसूल केले. त्याच्या या विध्वंसक फलंदाजीमुळे टीम इंडियाने पॉवरप्लेमध्येच अवघ्या 7 षटकांमध्येच 100 धावांचा टप्पा ओलांडला, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉवरप्लेमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम ठरला. जरी त्याचे शतक अवघ्या 6 धावांनी हुकले असले, तरी त्याच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने 377 धावांचा विशाल डोंगर उभा केला.
या विक्रमांव्यतिरिक्त वैभवने वयाच्या बाबतीतही एक नवा इतिहास रचला आहे. अवघ्या 15 वर्षे 86 दिवस वय असलेला वैभव सूर्यवंशी लिस्ट ‘ए’ क्रिकेटचा अंतिम सामना खेळणारा जगातील सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. अंतिम सामन्याच्या दडपणाला झुगारून त्याने श्रीलंकन गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. जरी तो 94 धावांवर बाद झाल्यामुळे लिस्ट ‘ए’ मधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडू शकला नसला, तरी त्याच्या या खेळीने जागतिक क्रिकेटचे लक्ष वेधून घेतले आहे .























































