
सध्या भाजपअंतर्गत राजकारण सुरू आहे. आणि भाजपाअंतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिंदे गटाचा राजकारणासाठी वापर होत आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळाासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर खोटे हसू आहे, दिल्लीतून ज्या पद्धतीने शिंदेंना बळ दिले जात आहे, ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, गोकुळ गिते यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले. तरी लोकांनी मतदान केले. हा चमत्कारच म्हणावा लागेल. आणि सगळेच मतदार हे शिंदे गट आणि भाजपचे होते, त्यांना सुरक्षित ठाण्यात ठेवले होते. नंतर याच मतदारांनी शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात मतदान केले. याचा अर्थ भाजपच्या सर्व मतदारांनी अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना मतदान केलं. हा एक रोष आहे गोकुळ गिते यांनी शिवसेनेकडे सहकार्य मागितलं होतं आम्ही ते त्यांना दिलं. आमचं मतदान त्यांच्यासाठी वळवलं. त्याचाही गिते यांना फायदा झाला. ही फक्त सुरुवात आहे. शिंदे गटात आणि भाजपमध्ये नेमके कुठल्या प्रकारचे संबंध आहेत. एकनाथ शिंदे बाजूला असताना मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे ते हसू खोटे आहे. दिल्लीतून ज्या पद्धतीने शिंद्यांना बळ दिले जात आहे, ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही. याची कल्पना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. सध्या भाजपअंतर्गत राजकारण सुरू आहे. आणि भाजपाअंतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिंदे गटाचा राजकारणासाठी वापर होत आहे. त्यामुळे आम्ही या घडामोडीकडे दुरून पाहत आहोत. पण शिंदे गटाचा एक उमेदवार भाजपने पाडला. यालाही बंड, उद्रेक म्हणा. शिंदे गटाकडून प्रचंड पैश्यांचा वापर झाला आणि धमक्याही दिल्या गेल्या. त्या धमक्यांची रेकॉर्डिंगही तुम्ही ऐकली असेल. गोकुळ गितेंना धमक्या दिल्या गेल्या, दबाव आणला गेला तरीही मतदारांनी गोकुळ गितेंविरोधात एकसाथ मतदान केले आणि मोठ्या संख्येने ते निवडून आले. या राजकारणामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी शिवसेना फोडली जात आहे. मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याच्या शिवसेना विरोध करत आहे, म्हणून शिवसेना कमजोर केली जात आहे. या राज्याचे नेतृत्व करणाऱ्या फडणवीसांना हे समजलं पाहिजे. आतापर्यंत यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, शरद पवार, इंदिरा गांधी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेतले महत्त्व माहित होते. शिवसेना ही राष्ट्रवादी संघटना आहे, काही लढाया सरकारला लढता येत नाहीत तेव्हा शिवसेना देशासाठी या लढाया होती हे सर्व मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेलं होतं. पण भाजप हा व्यापाऱ्यांचा पक्ष असल्याने त्यांना शिवसेनेचा भांडवलदार विरोध मान्य नाही. आम्ही भांडवलदारांना विरोध करू नये, मुंबई गिळणाऱ्यांना विरोध करू नये, मराठी माणसांच्या छातीवर बसणाऱ्यांशी आम्ही लढू नये ही जर फडणवीस आणि शिंदे गटाची किंवा सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल तर आम्हाला मान्य नाही. तुम्ही आमचे आमदार-खासदार फोडाल पण आमची जिद्द तोडू शकत नाहीत. काल उद्धव ठाकरे यांनी भांडूपच्या शाखेला भेट दिली तेव्हा एक विराट सभा झाली. लोकांचा रोष आणि लोकांचे शिवसेनेविषयी प्रेम हे अशा प्रकारे पुन्हा उसळून यायला लागले आहे. अमित शहा आणि शिंदे गटाने ही गद्दारी केली आहे, मुंबईसह महाराष्ट्र आम्ही पैशांनी विकत घेऊ शकतो हा या गद्दारीमागे एकमेव हेतू आहे.



























































