ठेकेदारांनी रस्ता सडवला…वाहनचालकांनी चिखल तुडवला, पहिल्याच पावसाने महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणात पावसाने दमदार सलामी देताच मुंबई-गोवा महामार्गाचं पितळं उघडं पडलं आहे. पहिल्याच पावसात महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. अर्धवट मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना प्रचंड त्रास होत आहे.‘महामार्ग नको पण रस्ता आवरा’, असं म्हणायची वेळ वाहनचालकांवर आली आहे.ठेकेदाराने रस्ता सडवला…वाहनचालकाने चिखल तुडवला असे चित्र पहायला मिळत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग कधी सुरू होणार याच्या तारखा देण्यात मंत्री आणि अधिकारी व्यस्त आहेत. दुसरीकडे ठेकेदार संथगतीने काम करत आहेत.यंदा पाऊस लांबला तरीही ठेकेदारांनी मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात चिखल येऊ नये म्हणून कोणतीही उपाययोजना केली नाही. धक्कादायक म्हणजे पाऊस सुरू झाल्यानंतर ठेकेदार काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराचे काम करत असल्याचे दयनीय चित्र पहायला मिळत आहे.

लांजा शहरात पहिल्याच पावसाने मुंबई-गोवा महामार्गाची दाणादाण उडवली.रस्त्यावर चिखलाचा ढीग पडला होता. ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी काय उपाययोजना केली हा प्रश्न उपस्थित होत आहे. महामार्गावरील चिखलात वाट काढत वाहन चालवावी लागणे हा प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न आहे. उक्षी आणि तुरळ याठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. हातखंबा येथील अर्धवट कामाचा फटका प्रवाशांना बसला.हातखंबा येथील शाळेसमोर चिखलाचे ढीग पडले होते. खेड तालुक्यात आवाशी येथे रस्ताच खचल्याने अपघात झाला. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरच पावसाने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.