…तर करार रद्द करू, होर्मुझ सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीच्या जागतिक चिंतेच्या पार्श्वभूमीवर एक मोठे विधान केले आहे. या धोरणात्मक सागरी मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर कोणताही टोल, विमा शुल्क किंवा इतर अतिरिक्त कर लादला जाणार नाही, असे आश्वासन इराणने अमेरिकेला दिले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत त्यांनी सांगितले की, इराणकडून याबाबत स्पष्ट संदेश आला आहे. मात्र, ही दिलेली माहिती चुकीची ठरल्यास दोन्ही देशांमधील सुरू असलेली शांतता चर्चा तात्काळ रद्द केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अलीकडेच इराणी अधिकाऱ्यांची वक्तव्ये, मीडिया रिपोर्ट्स आणि इराण-ओमान अधिकाऱ्यांमधील चर्चेनंतर इराण या मार्गावर कर लावणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, त्या पार्श्वभूमीवर हे विधान आले आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक मानला जातो. जागतिक स्तरावर समुद्रमार्गे होणाऱ्या कच्च्या तेलाच्या व्यापारापैकी सुमारे २० टक्के हिस्सा याच मार्गावरून जातो. त्यामुळे या मार्गावरील कोणताही अडथळा, अतिरिक्त शुल्क किंवा लष्करी तणाव याचा थेट फटका आंतरराष्ट्रीय तेल बाजार आणि जागतिक अर्थव्यवस्थेला बसतो. गेल्या काही महिन्यांपासून मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि इराण-अमेरिका वाटाघाटींमुळे ऊर्जा बाजारात अस्थिरता दिसून येत आहे.

दरम्यान, चर्चेचा भाग म्हणून अमेरिकेने इराणला पैसे हस्तांतरित केल्याच्या बातम्या ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. अमेरिकेने इराणला कोणताही निधी दिलेला नाही किंवा त्यांची कोणतीही गोठवलेली संपत्ती थेट त्यांच्या नियंत्रणाखाली दिलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र इराणला आवश्यक अन्नधान्य पुरवण्यासाठी अमेरिकेच्या नियंत्रणात असलेल्या इराणी निधीचा काही भाग विशेष उद्देशासाठी जारी केला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. या पैशातून अमेरिकन शेतकरी आणि पशुपालकांकडून मका, गहू आणि सोयाबीन यांसारखी कृषी उत्पादने खरेदी केली जातील. इराणला अन्नधान्याची अत्यंत तातडीची गरज असल्याने ही सर्व उत्पादने केवळ अमेरिकेकडूनच खरेदी केली जातील, असेही ट्रम्प म्हणाले आहेत.