
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर निकोटीन पाऊचेस् विकण्यास मनाई करण्यात आली आहे. याविरोधात येथील एका दुकानाने दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत या दुकानावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याचे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
सिगारेटला पर्याय म्हणून निकोटीन पाऊचेस् हा तोंडात ठेवण्याचा एक प्रकार आहे. याच्या विक्रीसाठी ड्रग् अॅण्ड कॉस्मॅटिक कायद्याअंतर्गत नोंदणी आवश्यक आहे, असे सांगत केंद्रीय सीमा शुल्क विभागाने या दुकानाला हे पाऊचेस् विक्री करण्यास मनाई करणारी नोटीस धाडली. या नोटीसला दुकानाने याचिकेद्वारे आव्हान दिले. न्या. सुमन शाम व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सीमा शुल्क विभागाला कारवाई न करण्याचे अंतरिम आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी दुकानाकडून करण्यात आली. या याचिकेचे उत्तर सादर करण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती केंद्र सरकारचे वकील रुई राड्रीक्स यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी
निकोटीन पाऊचेसची विक्री आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केली जाते. हे पाऊचेस् हिंदुस्थानातून घेतले जात नाहीत. तेव्हा ड्रग आणि कॉस्मॅटिक कायदा यासाठी लागू होत नाही, असा दावा दुकानाने केला आहे.
निकोटीन पाऊचेस् हे औषध नाही. हे औषध असल्याचा कोणताही खुलासा केंद्र सरकारने केलेला नाही. औषधाचे अंश यात नसतात. आमची बाजू न ऐकताच पेंद्र सरकारने हे पाऊचेस् विक्रीवर निर्बंध आणले आहेत, असेही दुकानाचे म्हणणे आहे.






























































