
अमेरिकेचे नागरिकत्व असूनही अखेरचा श्वास आपल्या मायभूमीत घेता यावा यासाठी एका ९४ वर्षांच्या आजीबाईंनी अमेरिकेचे नागरिकत्व सोडले. “मला हिंदुस्थानी नागरिक म्हणून मरायचे आहे, तसेच माझ्याच जन्मभूमीत माझ्यावर अंत्यसंस्कार व्हावेत अशी माझी इच्छा आहे,” असे सांगत आजीबाई हिंदुस्थानात पोहोचल्या आहेत.
आंध्र प्रदेशातील ९४ वर्षांच्या कोंड्रगुंटा महालक्ष्मीम्मा यांनी अमेरिकेचे नागरिकत्व सोडून पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. तब्बल १८ वर्षे अमेरिकेत वास्तव केल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना आपल्या मातृभूमीची ओढ स्वस्थ बसू देईना.
महालक्ष्मीम्मा या आपल्या मुलासोबत आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे. व्यंकट मुरली यांच्या कार्यालयात पोहोचल्या. वयाच्या ९५ कडे झुकलेल्या महालक्ष्मीम्मा यांनी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडली, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांसह तेथील अधिकारीही भावुक झाले.
अमेरिकेच्या ‘ग्रीन कार्ड’चा मोह सोडला
महालक्ष्मीम्मा यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रवासाविषयी सविस्तर माहिती दिली. पती नागाभूषणम यांच्या निधनानंतर त्या अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील पीटर्सबर्ग येथे गेल्या होत्या. त्यांचा मुलगा बुच्चय्या चौधरी हे तिथे कर्करोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. मुलासोबत राहताना जुलै २००० मध्ये महालक्ष्मीम्मा यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आणि पुढील १८ वर्षे त्या तिथेच राहिल्या.



























































