
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दोन विदेशी भाषांचा अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वीपर्यंत त्यांचे विषय बदलण्याची गरज नाही. म्हणजेच ते दोन विदेशी भाषा शिकू शकतील.
मे महिन्यात, सीबीएसईने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यांतर्गत परिपत्रक जारी केले होते. त्यात म्हटले होते की, १ जुलै २०२६ पासून, इयत्ता ९ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन भाषांचा अभ्यास करणे आवश्यक असेल, ज्यांपैकी किमान दोन भारतीय भाषा अनिवार्य असतील. या निर्णयानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांनी आक्षेप घेतला.
शिक्षण मंत्रालयाने हेदेखील स्पष्ट केले की, याला सरकारचा ‘यू-टर्न’ किंवा धोरणातील बदल समजू नये. शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, ही तरतूद आधीपासूनच अस्तित्वात होती, परंतु परिपत्रकात तिचा स्पष्ट उल्लेख नव्हता. विद्यार्थी आणि शाळा यांच्यात कोणताही गैरसमज टाळण्यासाठी हा संभ्रम आता दूर करण्यात आला आहे.
नवे भाषा सूत्र सहावीपासूनच्या तुकड्यांसाठी
त्यानंतर आता सरकारने एक पाऊल मागे घेतल्याचे समजते. यापुढे दोन भारतीय भाषांचा नियम भविष्यलक्षी पद्धतीने लागू केला जाईल. याचा अर्थ, ही व्यवस्था केवळ इयत्ता ६ वी पासून सुरू होणाऱ्या नवीन तुकड्यांनाच लागू होईल. सध्या इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना हा नियम पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही. असे विद्यार्थी इयत्ता १० वी पर्यंत त्यांच्या सध्याच्या भाषेतच शिक्षण सुरू ठेवू शकतील.




























































