
अनधिकृत बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी भूमाफियांनी न्यायालयाची बोगस स्टे ऑर्डर तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. जे बांधकाम वाचवण्यासाठी ही स्टे ऑर्डर तयार करण्यात आली होती त्याच सारसोळेतील बांधकामावर अतिक्रमण विभागाने बुलडोझर चालवला.
बोगस स्टे ऑर्डर घोटाळा उघड झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अनधिकृत बांधकामांना स्थगिती देणाऱ्या न्यायालयाच्या आदेशांची माहिती मागवली आहे. नेरुळ येथील सेक्टर ६ मधील सारसोळे गावात बेबीताई ठाकूर यांनी सहा मजल्यांची अनधिकृत इमारत उभी केली आहे. या इमारतीवर कारवाईसाठी महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली होती. या नोटीसला बेबीताई ठाकूर यांनी बेलापूर न्यायालयात आव्हान दिले होते. या प्ररकणाची सुनावणी सुरू असताना हे बांधकाम पाडण्यास न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नाही. मात्र भूमाफियांनी न्यायालयाच्या आदेशच बनावट तयार केला. कारवाईला स्थगिती देण्यात आली असल्याची ऑर्डर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आली. त्यानंतर हा बनावट स्टे ऑर्डर घोटाळा उघड झाल्यानंतर प्रशासनाने ही अनधिकृत इमारत जमीनदोस्त केली.





























































