फैयाज प्रेमजीला पोलीस कोठडी, मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान झिंक फॉस्फाईडयुक्त गोळ्यांचे वाटप; जप्त साहित्य पाठवणार फॉरेन्सिक लॅबला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान उंदराचे विष म्हणून वापरले जाणाऱ्या झिंक फॉस्फाईडयुक्त गोळ्यांचे वाटप केल्याप्रकरणी फैयाज प्रेमजीला भायखळा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर संपूर्ण जग आपल्याविरोधात कट रचत आहे असे त्याला वाट होते. प्रेमजीवर मानसोपचार सुरू होते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस प्रेमजीच्या वडिलांचा जबाब नोंदवणार आहेत. त्याच्या या कृत्यामागील हेतू स्पष्ट झालेला नाही.

शुक्रवारी मोहरमनिमित्त भायखळ्याच्या अंजीरवाडी येथून मिरवणूक रहमत बाग कब्रस्थान येथे जात होती. या मिरवणुकीत गोवंडी येथे राहणारा सलमान सय्यद हा सहभागी झाला होता. मातम केल्यानंतर त्याने थोडा आराम केला. तेव्हा बुरखा परिधान केलेली एक महिला आली. तिने त्याला वेदनाशामक गोळ्या दिल्या. तसेच मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्यांना अन्न, औषधे, ज्यूस आणि पाणी मोफत दिले जात होते. त्या गोळ्यांबाबत त्याने विचारणा केली. रात्री सलमान हा घरी गेला. त्याला त्रास होऊ लागला. ज्याने गोळ्या घेतल्या, त्यांना त्रास होऊ लागला. 4-5 जणांना त्रास झाल्याने ते बेशुद्ध झाले. तेव्हा प्रेमजी तेथे थांबला होता. पोलिसांनी छापा टाकून 14 हजार 900 कॅप्सूल जप्त केल्या. त्याच्या विरोधात भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

शरीरावर काय होतो परिणाम

झिंक फॉस्फाईड शरीरात गेल्यावर किंवा श्वासावाटे आत घेतल्यावर, ते पोटातील आम्लांशी अभिक्रिया करते. त्यातून ‘फॉस्फिन वायू’ बाहेर पडतो. हा वायू रक्तप्रवाहात मिसळतो आणि त्यामुळे शरीरातील पेशींना ऑक्सिजन न मिळाल्यास अनेक अवयव निकामी होऊ शकतात.

50 किलो झिंक फॉस्फाईड

  प्रेमजी हा मूळचा पुण्याच्या विमान नगरचा रहिवासी आहे. तो त्याच्या वडिलांसोबत रंग बनवण्याच्या कारखान्यात काम करतो. प्रेमजी हा ज्या गेस्ट हाऊसमध्ये थांबला होता, तिथे पोलिसांना 30 हजार गोळ्या आढळून आल्या. त्यापैकी 14 हजार 900 गोळ्यांमध्ये झिंक फॉस्फाईड भरले होते. त्याने 50 किलो झिंक फॉस्फाईड मागवले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्या गेस्ट हाऊसमध्ये मुकामी होता. त्याने प्रत्येक कॅप्सूलमध्ये 1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड भरले होते. जप्त केलेले ते सर्व साहित्य फॉरेन्सिक लॅबला पाठवले जाणार आहे.