
पावणे सहा लाखांचे दागिने चोरीप्रकरणी मोलकरणीला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. शिला चिंबडे असे तिचे नाव आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर केले होते. कर्ज झाल्याने तिने चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
तक्रारदार या अंधेरी येथे राहतात. त्यांच्याकडे शिला घरकामासाठी होती. 23 जूनला तक्रारदार यांच्या बहिणीच्या मुलाचे लग्न होते. त्यामुळे त्यांनी कपाटातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दागिने मिळून आले नाहीत. घडल्याप्रकरणी तक्रारदार यांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक सचिन गवस यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक दिलीप काळे, उपनिरीक्षक अविनाश दराडे, लगास, बोटे, गवळी, पात्रे, साबळे आदींच्या पथकाने तपास सुरू केला.
पोलिसांनी शिलाला ताब्यात घेतले. तिच्या बँक खात्याच्या पासबुकची तपासणी केली तेव्हा तिने एका बँकेतून साडेपाच लाखांचे कर्ज घेतल्याचे उघड झाले. कर्जाबाबत तिला विचारणा केली असता तिने दागिने चोरल्याचे पोलिसांना सांगितले. कर्ज फेडण्यासाठी चोरी केल्याचे समोर आले. तिला अटक करून न्यायालयात हजर केले होते.


























































