
मुंबईत सध्या निसर्गामुळे 10 टक्के तो 20 टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. अशातच बऱयाच वेळा विद्युत बिघाडाच्या तांत्रिक कारणांमुळे पाणीकपातीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे भविष्यात तांत्रिक कारणांमुळे पाणीकपातीचा मुंबईकरांना सामना करावा लागू नये यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून मुंबईकरांना सुरळीत पाण्याचा पुरवठा करता यावा यासाठी तिथे अतिरिक्त 110 के.व्ही.चे विद्युत उपकेंद्राच्या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर उभारले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला तरी पाणीपुरवठा ठप्प होणार नाही.
भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्र हे आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. मुंबई शहराचा सुमारे 80 टक्के पाणीपुरवठा भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रातून होतो. भांडुप संकुल केंद्रामध्ये विद्युत पुरवठा येथील 110 के.व्ही. विद्युत उपकेंद्रामधून होतो. संपूर्ण भांडुप संकुल येथील विद्युत पुरवठय़ाची जबाबदारी या 12.5 एमव्हीए क्षमतेच्या दोन ट्रान्सफॉर्मरमार्फत पार पाडली जाते. हे 12.5 एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर 2015 साली उभारले होते. एक ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास उपलब्ध दुसऱया ट्रान्सफॉर्मरवर संपूर्ण भांडुप संकुल केंद्राचा विद्युत पुरवठा करण्याची जबाबदारी पडते. परिणामी, मुंबई शहराच्या एकंदरीत 80 टक्के पाणीपुरवठय़ाची जबाबदारी दुसऱया ट्रान्सफॉर्मरवर पडते. जर दुसऱया ट्रान्सफॉर्मरमध्येही बिघाड झाल्यास संपूर्ण भांडुप संकुलातील पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता असते. परिणामी, मुंबई शहराचा पाणीपुरवठा मोठय़ा प्रमाणात खंडित होऊ शकतो. अशा प्रकारची घटना टाळण्यासाठी 110 के.व्ही. विद्युत उपकेंद्र (भांडुप संकुल) येथे पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि संबंधित स्विच गिअर आदींची उभारणी केली जाणार आहे.
14.67 कोटींचा खर्च करणार
ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास 4 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो व उच्च विद्युत दाबाच्या नवीन ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा करण्याकरिता 8 ते 10 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अशा प्रकारची घटना पिसे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये 2024मध्ये घडली होती. त्यामुळे महिनाभरासाठी मुंबईच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भांडुप संकुलातील विद्युत उपक्रेंद्रात अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवले जाणार आहे. यासाठी 14.67 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
दिवसाला तीन हजार दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धीकरण
संपूर्ण मुंबईला उर्ध्व वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार व तुळशी या धरणांमधून दैनंदिन पाणीपुरवठा होतो. या धरणांतून होणाऱया पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुल, पिसे पांजरापूर संकुल, विहार व तुळशी या ठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात केले जाते. त्यामुळे अशा प्रकारे सुमारे 4 हजार दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा प्रत्येक दिवशी मुंबईला केला जातो. या 4 हजार दशलक्ष लिटर पाणी पुरवठय़ापैकी 1910 दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धीकरण भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रात केले जाते. हे आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. याव्यतिरिक्त 2014मध्ये 900 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन अतिरिक्त जलशुद्धीकरण केंद्र भांडुप संकुल येथे उभारण्यात आले. त्यामुळे सुमारे 3000 दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धीकरण व दैनंदिन पाणीपुरवठा भांडुप संकुल केंद्रातून केला जातो.




























































